आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर समाजाचे साहित्य प्रवाहात आणू , धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. संजय सोनवणी यांचा विश्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आदिवासीधनगर समाजाला पुरातन काळापासून सांस्कृतिक अस्तित्व लाभले आहे. हे अस्तित्व मुख्य प्रवाहात येऊ शकले नाही. ते कायम वंचित राहिले. मात्र धनगर समाजाचा इतिहास, राजकारण, साहित्य हे समाजासमोर येण्यासाठी धनगरांची स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच साहित्यिक विचारवंत संजय सोनवणी यांनी केले. 

ते हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित केलेल्या पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या वेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी मंत्री अण्णा डांगे, खासदार राहुल शेवाळे, उद्योजक छगन पाटील, स्वागताध्यक्ष जयसिंग शेंडगे, माजी आमदार हरिभाऊ भदे, संमेलनाचे संयोजक डॉ. अभिमन्यू टकले, कार्यवाह श्रावण वाकसे, जयश्री वाकसे, विष्णुपंत गावडे, मनीषा माने, संभाजी सूळ, अशोक बन्नेनवर, यशवंत सेनेचे माधव गडदे, अर्जुन सलगर हे उपस्थित होते. 

संमेलनाचे अध्यक्ष श्री. सोनवणी म्हणाले, साहित्याचे विविध प्रकार आहेत. त्यातील वैचारिक साहित्य हा व्यक्तिमत्त्वाचा पाया असतो. ज्या समाजाला तत्त्वज्ञान नाही, तो समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होत असतात. धनगर समाजाला आदिम अशी प्रेरणा आहे. सातवाहनापासून ते आजपर्यंत धनगर समाजामध्ये अनेक नामवंत कवी, लेखक, विचारवंत झाले आहेत. धनगरी ओव्या हा आदिवासी साहित्याचा आत्मा आहे. धनगरी लोकनृत्य भारतीय नृत्याचा मुख्य सूत्रधार आहे. 
 
समाजातील लेखक, कवी समाजाची दु:खे मांडत नाही तर प्रस्थापित लेखक हे धनगर समाजाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच या संमेलनाचे प्रयोजन केले आहे. जंगल, दऱ्यात वाढलेल्या या मूक समाजाला आवाज देण्यासाठी स्वत:ची शैली निर्माण करून ते समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सोनवणी यांनी सांगितले. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमारदेशमुख यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. 

समारंभाचे अध्यक्ष अण्णा डांगे म्हणाले, धनगर समाजात विविध विचारसरणीचे लोक आहेत. विचारभेद असले पाहिजे, पण मनभेद करणे समाजासाठी घातक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक असले तरी समाजाने त्यासाठी जाब विचारला पाहिजे. अशा प्रकारचे साहित्य संमेलन अन्य भागांत होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे डांगे म्हणाले. संमेलनाचे प्रास्ताविक संयोजक डॉ. अभिमन्यू टकले यांनी केले. स्वागताध्यक्ष जयसिंग शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले. छगन पाटील यांनी आभार मानले. जयसिंग यांच्या हस्ते विविध दालनांचे उद्घाटन करण्यात आले. 

भंडारा उधळून उद्घाटन  
कार्यक्रमाचे उद्घाटन  भंडारा उधळून येळकोट येळकोटचा जयघोष करत करण्यात आला. सुरुवातीला धनगरी गजनृत्य ओव्यांचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी जगभरात गाजत असलेल्या आरेवाडी (जि. सांगली) येथील मंडळांनी धनगर गजनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. धनगरी ओव्यांतून समाजप्रबोधन करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...