सोलापूर- सोलापूरचा फॅशन डिझायनर आणि साडी तज्ज्ञ विनय नारकर यांना देशाच्या व सोलापूर साडीच्या विशेष पारंपरिक धोतींचे सिंगापूरला मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन करण्यासाठी आर्टीझेन एलएलपी यांचे निमंत्रण आले आहे. तेलंगणा आणि आंध्रच्या कारागीरांकडून हव्या त्या रंगात धोतीचे तागे तयार करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारात तयार करण्याचे काम विनय सध्या जोरात करतो आहे.
त्याच्या या कामाने देशात पहिल्यांदाच भारतीय पुरुषांसाठी हातामागावरच्या धोती या वस्त्राला पुनरूज्जीवन मिळणार आहे.या पारंपरिक व नव्या प्रकारच्या धोतींचे उद््घाटन व प्रदर्शन सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई आणि त्यानंतर थेट सिंगापूरला होणार आहे. ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी सगळीकडे हातमागावरचे धोती (धोतर ) वापरले जायचे. मात्र जशी औद्योगिक क्रांती होत गेली तसा या वस्त्रप्रकाराला पूर्णविराम मिळत गेला.
मात्र सध्या युवा पिढीत पुन्हा एकदा लग्न कार्यात, घरगुती समारंभात धोती वापरण्याची आवड पाहून विनय या प्रकाराकडे वळला असून, त्याने गेले दोन वर्षे संशोधन करून आंध्र आणि तेलंगाणाच्या श्रीकापुरम या मागासलेल्या गावात जाऊन याचे विणकर शोधून काढले आहेत. या दोन राज्याशिवाय याचे उत्पादन आता देशात कोठेही होत नाही. या जुन्या प्रकारच्या अस्सल धोतीवर पुन्हा काही नव्या पद्धतीचे काम करून विनय युवा पिढीसाठी याचे नवे विशेष संग्रह तयार करणार आहे. पोरस या नावाने सुरू केलेले हे प्रदर्शनात पंधलपाका, कोंडुरू,गोरांचू, मंगलगिरी, लुखंडी असे हे १० पारंपरिक प्रकारचे धोती असणार आहेत. ते खादीचे असून, केवळ हातमागावरचे असणार आहेत.
अनोखे असेल प्रदर्शन
पारंपरिक रंगाचे पांढरे, करडे, लाल, जांभळे आणि याव्यतिरिक्त विविध मोहक रंगाच्या धोती असतील. मात्र त्यात विशेष आकर्षण असेल ते सोलापुरी साडीपासून तयार केलेल्या धोतीचे. जे खूप वेगळ्या प्रकारचे असणार आहे. तर राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त याचे प्रथम उद्््घाटन सोलापुरात करण्यात येणार आहे.
विणकर खूप कमी
आंध्र व तेलंगण राज्यांत हातमागावर काम करणारे दुर्मिळ झाले आहेत. या निमित्ताने जुनी वस्त्र परंपरा व हातमागाचे पुनरूज्जीवन याचा विचार करून हे काम हाती घेतले.”
- विनय नारकर, फॅशन डिझायनर