सोलापूर- सद्भावना वंदे मातरम् मंडळाच्या वतीने स्वातत्र्यदिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. यंदा प्रथमच मंडळाच्या वतीने ढोल -ताशा-झांज या वाद्यांचा कार्यक्रम होईल. तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती सद्भावना सेवा दलाचे दिव्यकांत गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
सद्भावना वंदे मातरम् मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात ऑगस्टपासून करण्यात आली. राष्ट्रीय एकात्मता उपक्रमांतर्गत भारतमाता स्केटिंग यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ऑगस्ट रोजी ही यात्रा कुर्डुवाडी, माढा अनगर या ठिकाणी काढण्यात आली. तिरंगा यात्रेत सहभागी मुले हातात तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तीपर गीतांवर स्केटिंग केले. याला लाेकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे श्री. गांधी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस नारायण छाब्रिया, रमेश बिराजदार, पुंडलिक शिंदे, श्रुती माने आदी मान्यवर उपस्थित होते.
ढोल, ताशांचा कार्यक्रम
१५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रभात टॉकिजसमोरील तिरंगा मंडप येथे मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल. त्यानंतर विश्वविनायक वाद्यवृंदच्या वतीने ढोल, ताशा, झांज या वाद्यांचा वापर करून देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम होईल. सुयश, ज्ञानप्रबोधिनेचे विद्यार्थी ढोल, ताशा वाजवणार आहे. या कार्यक्रमात जवळपास ५० मुलांचा सहभाग असणार आहे.
निबंधस्पर्धा
शालेय विद्यार्थ्यांसाठी २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता सद्भावना तिरंगा बंगला येथे निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. निसर्गास होणारे कोणते नुकसान आपण थांबवू शकाल कसे हा निबंध स्पर्धेचा विषय असणार आहे. विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन दिव्यकांत गांधी यांनी केले आहे.
सचिन तेंडुलकर यांना आणण्याचा मानस
सद्भावना वंदे मातरम् मंडळाच्या वतीने गेल्या २२ वर्षांपासून स्वातत्र्यदिनाचे औचित्य साधून तिरंगा यात्रेचे आयोजन केले जाते. आतापर्यंत सुमारे ९७ यात्रा शहर जिल्ह्यात काढण्यात आलेल्या आहेत. १५ ऑगस्ट २०१७ रोजी १०१ वी रॅली असणार आहे. या रॅलीला प्रमुख पाहुणे म्हणून भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना सोलापूरला आणण्याचा मानस असल्याचे गांधी यांनी सांगितले.