आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषदेच्या उमेदवारीने दिलीप माने यांना राजकीय उभारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी संख्याबळ नसतानाही उमेदवारी घेऊन दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी अामदार दिलीप माने यांनी मोठे अाव्हान स्वीकारले अाहे. नारायण राणे भाजपकडून असते तर कदाचित शिवसेनेचा पाठिंबा मिळाला असता पण अाता तेही शक्य नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माने यांची ही साखर पेरणीच म्हणावी लागेल. पराभव झाला तरी राजकीय पटलावर श्रेष्ठींसमोर सहानुभूती राहील अाणि विजय मिळालाच तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमोर अातापासूनच मोठे अाव्हान असेल अशी सध्यातरी चर्चा रंगली अाहे. 

 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माने यांचा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पराभव केला होता. तरीही सहकारातील संस्थांमध्ये सत्तेत राहिल्याने दिलीप माने यांचे राजकीय वलय कायम अाहे. त्याच जोरावर त्यांनी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मिळविण्यात यश मिळविले अाहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी त्यांची जेवढी जवळीक अाहे, तेवढीच माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी अाहे. पतंगराव कदमांचे भक्कम पाठबळ त्यांच्यामागे अाहेच. स्थानिक राजकारणात माने यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसच्या बहुतेक नेत्यांचा विरोध अाहे. त्यामुळेच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होेते. काही दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर मुक्कामी असताना राजशेखर शिवदारे, दिलीप माने यांच्यात समझोता घडवून अाणल्याचे समजते. येणाऱ्या बाजार समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही जमवाजमव झाली असली तरी दिलीप माने जर विधानपरिषदेत यशस्वी झाले तर शिवदारेंसह बाळासाहेब शेळके इतर इच्छुक नेत्यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा होईल. जर तसे झाले नाही तर मानेंना बाजार समिती शिवदारेंकडे सोपवून विधानसभेसाठी पाठिंबा मिळवावा लागणार अाहे. 

 

त्यादृष्टीने दिलीप माने यांची ही तयारी सुरू अाहे. त्यांच्या उमेदवारीमुळे अनेकांना अाश्चर्याचा धक्का बसला अाहे. माने यांनी स्वत: ही निवडणूक लढविण्याची तयारी दाखविल्याने त्यांना ही उमेदवारी दिली गेल्याचे काँग्रेस वर्तुळातून सांगितले जाते. शिवाय शिंदे पवारांचे पाठबळ अाहेच. राणे असते तर कदाचित संधी मिळाली असता, असा मतप्रवाह अाहे. भाजपचे उमेदवार हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. त्यामुळे माने यांच्यासमोर दोन्ही बाजूंनी मते मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार अाहे. 


भाजप -शिवसेना अपक्ष अाणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मतांतील फरक जास्त अाहे. किमान ५० अामदारांची मते जमविली तर माने कुठेतरी चुरशीच्या लढतीत दिसतील. पण तशी शक्यता सध्यातरी कमी अाहे. 

 

दिलीप माने यांच्या या राजकीय खेळीचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर नक्कीच पडणार अाहे. ते जर निवडून अाले तर तो अाणखी गडद असेल. काँग्रेस पक्षाला येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तो फायदेशीर ठरेल, या दृष्टीनेच माने-शिवदारे यांच्यात दिलजमाई झाली अाहे. काँग्रेस कमिटी अाणि माने यांच्यात अंतर राहिले अाहे. ते पाहिल्यानंतर सगळ्या गोष्टी जर-तरच्याच अाहेत. पण विधानपरिषेदच्या निवडणुकीतील उमेदवारीमुळे दिलीप माने राज्याच्या राजकारणात चमकले अाहेत अाणि राजकीय उभारी मिळाली अाहे, एवढे मात्र नक्की. 

बातम्या आणखी आहेत...