सोलापूर - ‘सर्वधर्मांमध्ये एकसंघ असणारी आधुनिक ‘भक्ती’ चळवळ हीच संबंध हिंदुस्थानातील आजपर्यंतची सर्वांत मोठी चळवळ आहे. अखंड मानव जातीला जोडून घेण्याची परंपरा भक्ती चळवळीत आहे’, असे प्रतिपादन साहित्य अकादमीचे मराठी सल्लागार, ज्येष्ठ लेखक भालचंद नेमाडे यांनी येथे केले.
साहित्य अकादमी आणि हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र, आंध प्रदेश कर्नाटकातील भक्ती चळवळ : एक आधुनिक दृष्टिकोन या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्र आयोजिले आहे. त्याचे उद््घाटन सोमवारी प्रसिद्ध मराठी संशोधक मुहम्मद आझम यांच्या हस्ते झाले. त्यावेळी नेमाडे यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
श्री. नेमाडे म्हणाले, “समाजाला केंद्रीभूत करून संस्कृती चालवण्याचा अत्यंत विषारी असा प्रकार सुरू आहे. तो सर्वधर्मांना त्रासदायक ठरला आहे. याच्या वाढत्या अतिरेकामुळे सध्याच्या काळात व्यापक परंपरा चालवणे फारच कठीण झाले आहे. कुठे तरी, कुणाला त्रास झाला की त्याचे पडसाद आपल्याकडे उमटतात. संबंधित समाजातील व्यक्तीला पोटभर अन्न मिळत नाही, घर नसल्याने रस्त्यावर राहतात. त्याकडे दुर्घटनेपूर्वी दुर्लक्ष करणारे लगेच समाजाचा कणवळा आणतात. त्यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपण जेथे राहतो तेथील मूळ संस्कृती जोपासावी.
प्रत्येकधर्मातून काही चांगल्या गोष्टी दुसऱ्या धर्मतील अनुयायांनी घेतल्या आहेत. जैन, बौद्ध िहंदू अशा प्रकारचे रीतीरिवाज समाजात होते. जैन कल्चर हे मदर कल्चर असल्याचा उल्लेख त्यांनी केला. बौद्धांपासून ख्रिस्ती धर्मियांनी ननची पंरपरा घेतली. येशू ख्रिस्तांचे वडील बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी श्रीलंकेत गेले होते. अहिंसा सेवेसाठी वाहून घेण्याचा बौद्धधर्मातील प्रभाव ख्रिस्ती धर्मावर अाहे.”
श्री. आझम म्हणाले, “भक्ती चळवळीचा उदय आणि विकास दक्षिण भारतातून झाला. भक्ती चळवळीचा अभ्यास तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने केला पाहिजे. परमेश्वराकडून प्रेम मिळवण्यासाठी भक्ती करण्यात स्वत:ला मोक्ष मिळवण्याचा स्वार्थ असतो अन् समाजप्रबोधनाद्वारे लोककल्याणाचा मार्ग दाखविण्याचा परमार्थ असतो. सध्याचा हिंसाचार, दहशतवाद, अत्याचार, गोंधळ आदीवर भक्ती फारच गुणकारी असून संतांचा मानवतेचा दृष्टिकोन प्रभावी आहे. समर्थ रामदासांनी चळवळीचे सामर्थ्य मनाचे श्लोकातून सांगितले संत ज्ञानेश्वरांनी पसायदानाच्या माध्यमातून विश्ककल्याणाची मागणी केली.”
सुरुवातीला के. श्रीनिवासराव यांनी प्रास्तविक केले. प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी दोन दिवसीय चर्चासत्राचा उद्देश स्पष्ट केला. प्रा. मनोहर जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा किंबहुने यांनी आभार मानले.
भ्रष्टाचार करणे ही देखील देशभक्तीच
हल्लीकुणाच्या तरी सांगण्यावर देशभक्ती दाखवण्याचा प्रकार सुरू आहे. एखाद्या देशात ज्या पद्धतीने कपडे घालतात, त्याच पद्धतीने कपडे घालणे, सरसंघचालकासारखी घोषणा देणे किंवा एखाद्या सेनेने सांगितल्यासारखे वागणे म्हणजे देशभक्ती नाही. प्रामाणिक काम करणे, भ्रष्टाचार करणे हीच खरी देशभक्ती आहे, असे श्री. नेमाडे यांनी सांगितले.