आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅनल नावालाच, सत्ताधाऱ्यांचे ‘पायात पाय'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी संचालकांनी शुक्रवारी पॅनल जाहीर करून जागा वाटप केले. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी आमदार भारत भालके, कल्याणराव काळे यांच्यासह संचालकांच्या समर्थकांनीच विविध मतदारसंघांत अर्ज दाखल केल्यामुळे सत्ताधारी संचालकांनी एकमेकांच्या पायात पाय घातल्याचे चित्र पहायला मिळाले. १० डिसेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. या दरम्यान विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढून जिल्हा बँकेच्या राजकारणात ज्येष्ठांविरोधात नवी राजकीय आघाडी तयार करण्याचे प्रयत्न दिसून येत आहेत.
जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सध्या झाली. सत्ताधारी संचालकांनी शुक्रवारी शेतकरी सहकार विकास आघाडी पॅनेल जाहीर केले. बंॅकेच्या चौकशीला न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर भाजपाचे आमदार सुभाष देशमुख, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह काही नेत्यांनी संचालकांविरोधात बैठक घेतली. या बैठकीत निवडणूक लढवण्याच्या डरकाळ्या फोडण्यात आल्या. देशमुख, राऊत यांच्यासह बरेच लोक अर्ज भरण्यासाठीही फिरकले नाहीत.
दरम्यान, सोमवारी बार्शीतून आमदार दिलीप सोपल तर माढ्यातून संजय शिंदे यांची बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट झाले. दुपारी अर्ज दाखल केल्यानंतर संजय शिंदे यांनी काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांचे घर गाठले. म्हेत्रे यांच्या निवासस्थानी शिंदे आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील नेत्यांची बैठक झाली. दक्षिण सोलापूरची जागा बिनविरोध करण्याबरोबरच इतर जागांवरील निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे समजते. सत्ताधाऱ्यांनी पॅनल घोषीत केल्यानंतर बहुतांश जागांवरील उमेदवार निश्चित केले होते. या बैठकीला रणजितसिंह मोहिते, संजय शिंदे उपस्थित नव्हते. या दोघांतील राजकीय वादामुळे जागा वाटप फिसकटते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे शुक्रवारचे जागा वाटप कायम राहील का? या विषयी प्रश्नचिन्ह होते. सोमवारी शिंदे समर्थकांनी मोहिते, बागल, जगताप यांच्या विरोधात अर्ज दाखल करून बँकेचे राजकारण वेगळ्या दिशेने जाणार असल्याचे संकेत दिले.

म्हेत्रेंचा अर्ज कशासाठी ? डिसेंबरमध्येविधान परिषदेची निवडणूक होणार आहे. बँकेचे अध्यक्ष दिलीप माने, विद्यमान आमदार आणि संचालक दीपक साळुंखे त्यासाठी इच्छुक आहेत. या दोघांवर दबाव टाकण्याची खेळी आमदार सिद्धाराम म्हेत्रे करीत असल्याची चर्चा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आगामी दोन वर्षांत होईल. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील नेत्यांची मोट बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्याची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे.

कृषी पणन मतदारसंघात रणजितसिंह मोहिते यांच्याविरोधात आमदार भारत भालके, मंगळवेढ्याचे समाधान आवताडे यांचा अर्ज आहे. भालके यांनी सत्ताधाऱ्यांकडे मला किंवा कल्याणराव काळे यांना संचालक करा, असा आग्रह करून अर्ज भरल्याची चर्चा आहे. आवताडे यांनी मागच्या निवडणुकीत मोहितेंविरोधात अर्ज दाखल करून माघार घेतली होती. आता पुन्हा संजय शिंदे यांच्या इशाऱ्यावरच आवताडे मैदानात उतरले आहेत.

करमाळ्यात जयवंतराव जगताप यांच्या विरोधात जिल्हा परिषद सदस्य सुभाष गुळवे यांनी अर्ज दाखल केला आहे. महिला प्रतिनिधी मतदारसंघात रश्मी बागल सुनंदा बाबर यांनी अर्ज भरला. त्यांच्याविरोधात सुभाष गुळवे यांच्या पत्नी वनिता गुळवे आणि सुरेश हसापुरे यांच्या नातेवाइक सुनीता खुने यांच्यासह इतरांनी अर्ज दाखल केले. गुळवे हे संजय शिंदे यांचे समर्थक असून बागल-जगताप यांच्या कोंडीचा प्रयत्न करीत आहेत.

साळुंखेंवरही निशाणा
शेती,दूध संस्था मतदारसंघात आमदार दीपक साळुंखे यांच्याविरोधात आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे, मंगळवेढ्याचे रामेश्वर मासाळ, माढ्याचे संजय पाटील आदींनी अर्ज दाखल केले. आमदार शिंदे यांच्या पतसंस्था मतदारसंघात पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कल्याणराव काळे यांनी अर्ज दाखल केले आहेत.