आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता ५०० कोटी वसूल करा, ३५० कोटी रोख्यांत गुंतवा, अन्यथा दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेतील अनुत्पादक कर्जाचे प्रमाण (एनपीए) ३१ टक्क्यांवर गेले आहे. ८०० कोटी रुपयांच्या थकबाकीवर ‘नाबार्ड’ने उपाय सुचवले आहेत. ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत ५०० कोटी रुपये वसूल करा. ३५० कोटी रुपये शासकीय रोख्यांमध्ये गुंतवा. अन्यथा बँकेला मोठा दंड होईल, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. हे आव्हान समोर असतानाच, दुसरीकडे सहकार खात्यानेही बँकेचा फास आवळण्यास सुरुवात केली. पुणे विभागीय सहनिबंधक संतोष पाटील यांनी कलम ७९(१)ची नोटीस बजावून, कामकाजविषयी काही निर्देश दिले. हे तपशील बँकेचे अध्यक्ष राजन पाटील आणि सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी शनिवारी दिले.
बँकेच्या सभागृहात बँकेची ९८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यानंतर श्री. पाटील यांनी पत्रकारांसमोर बँकेची आर्थिक स्थिती मांडली. शासकीय रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी ५० कोटी रुपये काढून ठेवावे लागतील. पण ५०० कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी कठोर निर्णय घेतले आहेत. त्यात बँकेच्या तोट्यातील २२ शाखा बंद करण्याचे ठरले. अधिकारी कर्मचाऱ्यांना व्यवसायावर आधारित वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला. ज्यांनी उद्दिष्टाप्रमाणे काम केले नाही, त्यांना वेतनवाढ नाही. बढती नाही. अशा गोष्टींतून पैसे वाचवणे पर्यायाने बँक वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे श्री. पाटील म्हणाले.

बँकेची आर्थिक स्थिती
भागभांडवल: १७३.५८ कोटी
राखीव निधी : ३९९.१० कोटी
एकूण ठेवी : २४७५.४४ कोटी
दिलेली कर्जे : २५०१.९४ कोटी
शेती कर्जे : १४७६.७४ कोटी
बिगरशेती कर्जे : १०२५.४७ कोटी
निव्वळ नफा : १.०८ कोटी
थकित शेतीकर्जे : ८०० कोटी
एकूण थकीत कर्ज : ३१ टक्के

लेखापरीक्षणाचा वर्ग ‘ब’
जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी मुख्य कार्यालयातील सभागृहात झाली. त्या वेळी बोलताना अध्यक्ष राजन पाटील. मंचावर संचालक मंडळ.
मोहिते, सोपल, माने, जगताप, बागल नव्हते

शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. जिल्ह्यातील बरीच नेतेमंडळी शहरात आली. परंतु बँकेच्या सभेस आली नाहीत. खासदार विजयसिंह मोहिते, बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे बँकेचे ज्येष्ठ संचालक. हे दोघेही शहरात होते, सभेला आले नाहीत. त्यांच्याशिवाय इतर संचालकांपैकी रणजितसिंह मोहिते, करमाळ्याचे जयवंतराव जगताप, रश्मी बागल, मंगळवेढ्याचे बबनराव आवताडे हेही नव्हते. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे बँकेत आले. पण सभेत आले नाहीत. डीपीसीची दुपारी दोनला बैठक संपली. त्यानंतर तीनला बँकेची सभा सुरू झाली.

मामा म्हणतात, मोटेच जबाबदार
बँकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे यांनी थकबाकीला सरव्यवस्थापक मोटे हेच जबाबदार असल्याचे पत्र अध्यक्षांना दिले. त्यांनी वेळीच कायदेशीर कारवाई केली असती, तर ही वेळ आली नसती. उलट संचालक मंडळात झालेली चर्चा इतिवृत्तात वेगळ्या पद्धतीने घेऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचा आम्हा संचालकांवर विनाकारण जबाबदारी येण्याची शक्यता आहे. अशी कोणतीही जबाबदारी निश्चित झाल्यास, त्यास मोटे हेच जबाबदार राहतील, असे त्या पत्रात नमूद आहे.

इकडे सभेत ऑल इज वेल
बँकेची स्थिती अतिशय नाजुक झालेली असतानाही, वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व विषय पटापट मंजूर झाले. माळशिरस भागातील काही सभासद बिरगशेती कर्जाविषयी विचारणा करून संचालकांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करत होते. परंतु कुरुल (ता. माेहोळ)च्या एका सभासदाने त्यांचे म्हणणे हाणून पाडत होता. सर्व विषय मंजूर. आम्हाला कर्जे द्या, असे त्याचे म्हणणे होते. शेवटी संचालक संजय शिंदे यांनीच त्याला झापले. म्हणाले, “तुम्हाला कर्ज देण्यासाठीच वसुलीचा मुद्दा सभासद मांडत आहेत. ते तुमच्या डोक्यात शिरत नाही का?” सभासदांना उत्तरे देताना, श्री. पाटील यांनी सर्व थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...