आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कष्टाचं जिणं जगू, पण शिक्षणासाठी पै पै जमवू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कचरागोळा केल्याशिवाय घर चालत नाही. काम केल्याशिवाय सायंकाळी चूल पेटत नाही. घरची हलाखीची परिस्थिती आाणि शिक्षणाच्या अभावामुळे अत्यंत वाईट जीवन वाट्याला आले. शिक्षणाचे महत्त्व जीवनात खूप मोठे आहे. आम्ही शिकलो नसलो तरी मुले आणि नातवंडांना शिकवणार आहे. कष्टाचं जिणं जगू पण, शिक्षणासाठी पै पै जमवू, असा निर्धार शहरात कचरा वेचणाऱ्या महिलांनी व्यक्त केला. ‘दिव्य मराठी’तर्फे नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित दिलखुलास गप्पा कार्यक्रमात शहरातील या वंचित घटकांनी संवाद साधला.

कचरा वेचणाऱ्या महिलांमध्ये आर्थिक, आरोग्य, अज्ञान असे प्रश्न आहेत. संसाराचा गाडा ओढताना दमछाक होते. मुलांना शिक्षण द्यावं. मुलींचं आरोग्य, त्यांच्या भविष्याबाबत चिंता आहे. मुलं मोठी व्हावीत, नोकरी करावी. आर्थिकस्तर उंचावा असं वाटतं. परिस्थिती बिकट असलीतरी या महिलांची स्वप्ने मोठी आहेत.

नातवाला शिकवणार, मोठ्ठं करणार
पती वीटभट्टीवर काम करतात. दोन मुलं आहेत. शिक्षणाची किंमत आता समजू लागली आहे. माहेरी दु:खच होते. सासरीही अशीच स्थिती. तरीही पुढे जाण्याचा मार्ग शोधतोय. कचरा वेचत आयुष्य सुंदर करण्यासाठी नातवाच्या रूपात पाहतोय. त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी धडपड सुरू आहे. नोकरी करावं, तेही मोठे व्हावेत, असा आमचा मानस आहे. -मारम्मा पल्लोलू

शिक्षणासाठी मुबलक पैसा नाही, मुलांना शिक्षण द्यावं वाटतं
मी लहान असताना आईनं शाळेत घातलं. पण, घरात जेवायला नाही, पुस्तक, वही नाही. अभ्यासात मन कसं रमणार. सकाळी कामाला गेल्यावर रात्रीच घरी यायची. आजी कुठेतरी काम करून जेवण आणायची, तेच खाऊन बसायचो. मी थोडं शिकून शाळा सोडले. आता मुलगा शिकावं असं वाटतं. पण, त्याला दफ्तर, पुस्तक, पेन्सील, पेन घ्यायला मुबलक पैसे नाहीत. . मुलगा म्हणतो, आई मला गुरुजी बोलल्यालं कळतंय, लिहिता येत नाही. कामावर मी उशिरा आल्यास मुलांचा सांभाळ होत नाही. जेवण वेळेवर देता येत नाही. मुलाला मोठं करावं, शिक्षण द्यावं वाटतं.
-तुळशी रामू मिसालोलू

शिक्षण, आरोग्याचा मेळ नाहीच
आमचे मालक (पती) नाहीत. चार वर्षांपूर्वी आजाराने वारले. मुलगा आहे तोही एक वर्षापासून लकवा मारल्यामुळे आजारी आहे. महिन्याकाठी एक हजार रुपये औषध खर्च आहे. तीन नातू, सून घरी आहेत. सहावी चौथीत दोन नातू शिकतात. त्यांनाच शिकवून मोठ करावं असं माझ्या मनात आहे. कचरा वेचून आलेल्या पैशात संसार, शिक्षण, आरोग्य असा मेळ बसवायला कसरत होते. शंभर रुपये कुणाकडून घ्यायचे म्हटले तरी देताना विचार करतात. कुणाकडे घेतल्यास दिवसाकाठी वीस रुपये घेऊन पैसे देतात. अशी स्थिती कचरा वेचणाऱ्या महिलांची आहे. - सुमनखंडू जाधव

डोळ्याला भोवळ येईपर्यंत काम करतो
आमच्याआरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत. दिवसभर कचरा गोळा केला तरी पन्नास-शंभर रुपये मिळत नाहीत. अनेकदा डोकं भणभणतं, डोळ्याला भोवळ येते. पण, नाईलाज आहे. पोटासाठी काम करावंच लागतं. नाहीतर चूल बंद. खायचं काय. आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत. महागडे उपचार घ्यायला स्थिती बेताची नाही. पती हमाली काम करतात. दोन मुले आहेत. एकजण सातवी, एकजण अशिक्षित आहे. एक मुलगी आहे ती सहावीपर्यंत शिकलीय. फक्त काम आणि काम, अन् संसाराचा गाडा हाकायचा हेच आमच्या नशिबी. - मंगल आदिनाथ जाधव

कष्टाला मिळतो मातीमोल भाव
लहानवयात लग्न झाले. पती लवकरच गेले. अनेक संकटे आली. २० वर्षांपासून कचरा वेचण्याचे काम करते. रानावनात कचरा शोधत जावे लागते. खूप त्रास होतो. कचरा वेचल्याशिवाय पर्याय नाही. खूप शोधून आणलेल्या कष्टाला मातीमोल भाव येतो. काय करणार पण इलाज नाही म्हणून सगळे गुपचूप सहन करावे लागते. कचरा वेचतच मुलींचे लग्न केले. मुले शिकली नाहीत मात्र नातवंडे शिकत आहेत. त्यांना शिकवणार आहे. - सुरेखा पात्रे

जगायचे कसे कळत नाही
मीज य मल्हार चौकात राहते. पती अंथरुणाला खिळून आहेत. संसारासाठी पैसा पुरत नाही. खूप ओढाताण होते. मी शिकले नाही. त्यामुळे मुलांनी शिकावे असे वाटत होते. पण, मुलेही शिकली नाहीत. आता काळ बदलला आहे. नातवंडांना मी चांगल्या शाळेत घातले आहे. नातवंडे हुशार आहेत, चांगले शिकत आहेत. कचरा वेचून उदरनिर्वाह करणे आता अवघड बनत आहे. भंगार घेणारे कमी झाले आहेत. जगण्यासाठी सावकाराच्या पैशाची मदत घ्यावी लागते. नातवंडे शिकल्यानंतर हे चित्र बदलेल, असे वाटते. -नागूबाई गायकवाड

रात्री खायचे वांदे होतात
पती लवकरच गेले. त्यामुळे दोन मुलांना वाढविताना कचऱ्याने आधार दिला. लहानपणी शिकावे असे खूप वाटायचे. पण गरिबीने शिक्षणाला रामराम ठोकावा लागला. आईनेही कचरा गोळा करीत आम्हा बहिणीची लग्नं केली ..सण-वार असो अथवा नसो वणवण भटकल्याशिवाय कचरा मिळत नाही. कचरा मिळाला नाही तर संसार चालत नाही. सकाळी लवकर बाहेर पडून कचरा गोळा करावा लागतो. कचरा विकल्याशिवाय रात्री खायला मिळत नाही. मी पाहिलेले शिक्षणाचे स्वप्न मुलांमार्फत पूर्ण करायचे आहे. शिक्षणाने माझी पोरं मोठी होतील. -सौरम्मा भंडारी

लहानपणापासून कचरा वेचते
चौथीत असताना वडील गेल्यामुळे पुढे शिकता आले नाही. आईवर संपूर्ण कुटुंबाचा भार पडला. संघर्षातच कुुटुंबाचा गाडा ओढला. लग्न झाले, पती वीटभट्टीवर काम करतात. येथेही कष्टाने पिच्छा सोडला नाही. दोन मुले ज्ञानसागर प्रशालेत शिक्षण घेत आहे. मला शिकता आले नाही. पण मुलांना शिकवणार आहे. माझे शिक्षण झाले असते तर मला असे दिवस पाहावे लागले नसते. संघर्ष सुरू आहे. पण हार मानणार नाही. घंटागाडी नव्हती तेव्हा खूप कचरा मिळत असे. आता कचरा कमी मिळत असल्याने पैसाही कमी मिळतो. -लता पागे

"दिव्य मराठी' कार्यालयात आयोजित दिलखुलास कार्यक्रमात लता पागे, सौरम्मा भंडारी, नागूबाई गायकवाड, सुरेखा पात्रे, तुळशी मिसालोलू, मारम्मा पोल्लोलू, मंगल जाधव, सुमन जाधव यांनी सहभाग घेतला.

‘दिव्य मराठी’ने केला सन्मान
कचरा वेचणाऱ्यांकडे समाज नेहमीच तुच्छतेने आाणि वाईट नजरेने पाहतो. आधार कधी मिळत नाही. मात्र, ‘दिव्य मराठी’ने प्रथमच सन्मान दिला. खुर्चीवर बसविले. काचेच्या ग्लासात थंड पाणी पिण्यासाठी दिले. असा सन्मान प्रथमच अनुभवतो आहे. आम्हीही समाजाचे घटक असल्याची जाणीव करून दिल्याबद्दल आभार. अशा भावना या महिलांनी व्यक्ती केल्या.