आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माउलींची पालखी जिल्ह्यात; हरिनामाच्या गजरात स्वागत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज - कैवल्य सम्राट श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी (दि. २१) जिल्ह्यात आगमन झाले. सातारा सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर शासन प्रशासनाचे स्वागत स्वीकारून हा सोहळा मुक्कामासाठी नातेपुते येथे विसावला. पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटाविषयीच्या मागणीसाठी या पालखी सोहळ्याने जिल्ह्याच्या सीमेवर ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न केला. परंतु शासन प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन रद्द केले.
बरड (जि. सातारा) येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळा सकाळी ११ वाजून पाच मिनिटांनी जिल्ह्याच्या सीमेवर आला. तेथे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार हनुमंत डोळस, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, तहसीलदार सुरेखा दिवटे यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष जयमाला गायकवाड, उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, आमदार अॅड. रामहरी रुपनवर, मुर्तिजापूरचे आमदार हरिष पिंपळे, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, शंकर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते, पंचायत समितीच्या सभापती रुपाली बेंदगुडे, उपसभापती देशमुख आदी उपस्थित होते.
साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडून जिल्हाधिकारी मुंढे पोलिस अधीक्षक प्रभू यांच्याकडे पालखी सोहळ्याची सूत्रे सोपवण्यात आली. स्वागतानंतर पालखी सोहळा धर्मपुरी बंगला येथे विसाव्यासाठी गेला.

प्रशासन सकारात्मक, आंदोलन स्थगित : चोपदार
वर्षातून१७ दिवस वाळवंटात तंबू, राहुट्या घालण्यास परवानगी मिळावी. वारीकाळात भजन, कीर्तन करण्यास मुभा मिळावी, अशा आमच्या मागण्या होत्या. यासंदर्भात प्रशासन सकारात्मक विचार करत असल्याने आम्ही आमचे आजचे ठिय्या आंदोलन स्थगित केल्याचे समस्त वारकरी फडकरी द‍िंडी संघटनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, सोहळामालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार यांनी सांगितले.

संत तुकाराम महाराज पालखी
संततुकाराम महाराजांची पालखी अकलूजलगत पुणे जिल्ह्यातील चऱ्हाटी येथे मुक्कामी आहे. बुधवारी (दि. २२) सकाळी आठ वाजता पालखीचे जिल्ह्यात अकलूज येथे आगमन होईल. शासन प्रशासनाकडून स्वागत झाल्यानंतर या पालखीचे जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी १० वाजता होणार आहे. अकलूज मुक्काम राहील.

न्यायालयात दिलासा मिळेल
पालकमंत्रीदेशमुख म्हणाले, या संदर्भात उच्च न्यायालय काय निर्णय देते ते पाहू. न्यायालयाचा निर्णय विराेधात गेल्यास वाळवंटात तंबू घालणे भजन, कीर्तनाचे कार्यक्रम घेण्यास परवानगीसाठी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली जाईल, असे आश्वासन पालखी सोहळा विश्वस्तांना दिले आहे. उच्च न्यायालयातच या प्रकरणाला दिलासा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

स्वच्छता राखण्याच्या अटींवर परवानगी
वाळवंटातीलराहुट्या नित्य कार्यक्रमाबद्दलचे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. त्याची आज सुनावणी होती. या ठिकाणी वारकऱ्यांचे तंबू घालण्यासाठी भजन कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यासाठी काहीही हरकत नाही. परंतु त्या ठिकाणी स्वच्छता पाळणे, कसल्याही प्रकारची दुकाने थाटणे अशा अटींवर परवानगी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची कसलीही हरकत नाही, असे प्रतिज्ञापत्र आपण मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्याचे जिल्हाधिकारी मुंढे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

छायाचित्र: धर्मपुरी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी स्वागत केले. .
बातम्या आणखी आहेत...