आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सवात डॉल्बी लावून नाचण्याऐवजी, सामाजिक कामे करा; नाना-मकरंद यांचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरसह मराठवाड्यात गेल्या ४० दिवसांपासून पावसाने आेढ दिली तर देशभरात अनेक ठिकाणी महापूर आले. नद्या, विहिरीतील पाण्याप्रमाणेच आपल्या डोळ्यांमधील पाणी देखील आटतय. संवेदनशीलता कमी झाली तर जगून काय उपयोग? सण-उत्सवांमध्ये बदल करून डॉल्बीच्या तालावर थिरकण्याऐवजी वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, गरजूंना मदत असे विधायक उपक्रम राबवून सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हा. वेळीच जागे व्हा अन्् निसर्ग संवर्धन संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्या, असे भावनिक आवाहन ‘नाम’ फाउंडेशनचे संचालक नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी केले. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद््घाटन बुधवारी (दि. १६) नाना पाटेकर व मकरंदअनासपुरे यांच्या हस्ते रोपास पाणी घालून करण्यात आले. सोलापूर विद्यापीठात आयोजिलेल्या कार्यक्रमास कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, महापौर शोभा बनशेट्टी, किर्लोस्कर फेरस कंपनीचे आर. व्ही. गुमास्ते, महोत्सवाचे दिग्दर्शक वीरेंद्र चित्राव, केएफआयएल कंपनीचे युनीट हेड एस. एल. कुलकर्णी, प्रशासन अधिकारी डॉ. एस. पी. वैद्य, प्रा. नरेंद्र काटीकर आदी उपस्थित होते. 

श्री. अनासपुरे म्हणाले,“ सण, उत्सव अन्् महापुरुषांच्या जयंती-उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. जात-धर्माची वाढती तेढ सकारात्मकतेकडे नेणारी नाही. महात्मा गांधीजींचे नाव घेणारे अनेकजण आहेत. पण, त्यांच्यासारखे आचरण कितीजण करतात? फक्त बोलणे अन् घोषणा देऊन देशभक्ती व्यक्त होत नाही. चांगल्या कार्यासाठी झोकून देऊन कृतिशीलता हेच खरं देशप्रेम आहे. सण-उत्सवांमध्ये बदल करून डॉल्बीच्या तालावर थिरकण्याऐवजी वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, गरजूंना मदत असे विधायक उपक्रम राबवून सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हा. ‘नाम’ फाउंडेशनमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करा, कोणताही आर्थिक मोबदला आम्ही देत नाही. फक्त खूप काम करणाऱ्यांना प्रवास खर्च देऊ, असे त्यांनी सांगितले. 

श्री. पाटेकर म्हणाले, “नटसम्राटमधून मांडलेले दु:ख चार भिंतीमधील आहे. गावातील अन् शिवारातील लोकांचे दु:ख मोजता येत नाही. लोकांमध्ये गेल्याशिवाय त्यांचे प्रश्न समजत नाहीत. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्या गरजूंना मदतीचा हात दिला. शेवटपर्यंत नेण्यासारखी एकच गोष्ट करा. त्यासाठी आमटे कुटुंबीयांचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवा. शैक्षणिक अभ्यासक्रमात निश्चित बदल झाला पाहिजे. कोण-काय म्हणाले? कोण फितूर झाले? हा इतिहास आता नकोय. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची विरोधी पक्षाला सर्वाधिक काळजी असते, ज्या गोष्टी त्यांनी सत्तेत असताना केलेल्या नसतात. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्यांना सत्तेवर बसवते अन्् स्वत:च्या हक्कांसाठी झुलत राहते. सरकार आपल्यासाठी सर्वकाही करेल यापेक्षा आपण सरकारसाठी काय करणार? हे पाहा. शहराकडे जाण्याऐवजी गावाकडे जाऊन आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय करा, असे त्यांनी सांगितले.” विद्यापीठाच्या वेबसाइट अन् सोशल मीडियाद्वारे कार्यक्रमाचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. 

अन् नानांनी स्वत: पुसून घेतले पाणी 
रोपट्यास पाणी घालून कार्यक्रमाचे उद््घाटन झाले. त्याप्रसंगी टेबलवर सांडलेले पाणी नाना पाटेकर यांनी स्वत: रुमालाने पुसून घेतले. त्यानंतर एक विद्यार्थिनी त्यांना हस्तांदोलन करीत असताना पाण्याने भरलेला ग्लास कलंडला. तेही पाणी नानांनी स्वत: पुसत असताना विद्यापीठाचे कर्मचारी सरसावले. 

महापौरांनी बांधली नाना- मकरंदला राखी 
महापौर शोभा बनशेट्टी यांनी नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांना राखी बांधली. नाम फाउंडेशनला महापालिकेतर्फे सर्वतोपरी मदतीचे आश्वासन त्यांनी दिले. 

रजनीकांतच्या चित्रपटात झळकणार नाना 
सुपरस्टार रजनीकांत यांच्या एका आगामी चित्रपटात नाना पाटेकरांची प्रमुख भूमिका आहे. नानांनी स्वत: वसुंधरा महोत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी ती माहिती दिली. सुपरस्टार रजनीकांत यांनी त्या कथानकासाठी तुम्ही योग्य न्याय देऊ शकतो, चित्रपटात तुम्ही काम करा, असे सांगितल्याने नाइलाज झाला असून उद्या मी चेन्नईला शूटिंगसाठी जाणार आहे. रजनीकांत चित्रपटांमध्ये अनेकांना मारतो, तसेच मलाही मारतो, असा आेझरता उल्लेख करीत त्या चित्रपटात खलनायकाची भूमिका असल्याचे सुतोवाच केले. 
 
सांगोला येथील एका महिलेने यापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात नाना-मकरंद यांची भेट घेतली होती. विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात या महिलेने मंचावर जाऊन नाना-मकरंद यांना त्या भेटीची आठवण करून देताच दोघांनीही गहिवरून आले. 

अनासपुरेंच्या पत्नीने वाढवलेला वटवृक्ष दिला गुमास्तेंना 
नामचेसंचालक मकरंद अनासपुरे यांची पत्नी शिल्पा यांनी मुंबईतील फ्लॅटमध्ये वडाचे एक रोप कुंडीमध्ये लावले होते. गेल्या तीन वर्षांपासून जोपासलेल्या त्या वडाचे रोप किर्लोस्कर कंपनीच्या आवारात लावण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक आर. व्ही. गुमास्ते यांच्याकडे दिला. तो रोप योग्य ठिकाणी लावून त्याचे संरक्षण संवर्धन करा, अशी विनंती त्यांनी केली. 
बातम्या आणखी आहेत...