आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुहेरीकरणाला गती: अवघ्या तीन मिनिटांत जोडला जातोय रेल्वे रुळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विभागातील होटगी ते तिलाटीदरम्यानचे रेल्वे दुहेरीकरणाचे काम गतीने होत आहे. हे काम करणाऱ्या आरव्हीएनएल (रेल्वे विकास निगम लि.,) रेल्वे रुळ जोडणीसाठी फरिदाबाद येथून अाधुनिक फ्लॅश बेल्ट वेल्डिंग मशीन मागविली आहे. या मशीनद्वारे अवघ्या तीन मिनिटांत रुळाची जोडणी केली जाते. या मशीनमुळे दुहेरीकरणाचे काम गतीने होत असून अाधुनिक तंत्रज्ञानामुळे रेल्वे ट्रॅकची सुरक्षाही मजबूत होत आहे.

मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रेल्वे दुहेरीकरणाच्या कामाने आता वेग घेतला आहे. अद्ययावत यंत्राचा वापर कामासाठी होत आहे. ट्रॅक टाकण्याचे कामही वेगाने होत आहे.
पूर्वी रेल्वे रुळ एकमेकांना जोडण्यासाठी ४० ते ४५ मिनिटांचा अवधी लागायचा. परंतु नव्या मशीनच्या माध्यमातून अवघ्या तीन मिनिटांत रुळ जोडले जातात. होटगी ते तिलाटीदरम्यान सुरू असलेल्या कामात रोज रुळाचे ६० तुकडे जोडले जात आहे. ही मशीन रेल्वे रुळावर तसेच रस्त्यावरही धावते. या मशीनच्या माध्यमातून सोलापुरात पहिल्यांदाच रेल्वे रुळ जोडण्याचे काम केले जात अाहे. मशीनची किंमत १० कोटी रुपये आहे.

कामाची गती वाढली
रेल्वे रुळएकमेकांना जोडण्यासाठी फ्लॅश बेल्ट वेल्डिंग मशीनचा वापर केला जात आहे. यामुळे दुहेरीकरणाच्या काम गतीने होत आहे. राजू भडके, वरिष्ठ बांधकाम अभियंता, सोलापूर .

अशा पद्धतीने होते काम
रेल्वेरुळाचा तुकडा हा १३ मीटरचा आहे. असे तुकडे एकमेकांना जोडून रेल्वे ट्रॅक तयार केला जातो. रेल्वे रुळ जोडण्याचे काम जिकिरीचे असते. जोडण्याचे काम ठीक झाले नाही तर तुकड्यामध्ये गॅप पडून रेल्वे अपघात होण्याची शक्यता असते. पूर्वी हे काम करताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज लागायची. तसेच, हा वेळखाऊ प्रकार होता. एक रुळ जोडण्यासाठी सुमारे ४५ मिनिटांचा अवधी लागायचा. ही मशीन अत्यंत वेगवान पद्धतीने काम करते. हॉलंड येथे या मशीनची निर्मिती केली जाते. रुळ एकमेकांना जोडण्यासाठी मोठा दबाव लागतो. फॅल्श बेल्ट वेल्डिंग मशीन रुळामध्ये १८०० हायड्रोलिक प्रेशर निर्माण करते. तसेच, ४५० व्हाेल्टेजचा विद्युतप्रवाह रुळामध्ये सोडला जातो, असे अजितसिंग या कर्मचाऱ्याने सांगितले.