आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Ambedkar Visited Solapur On The Eve Of Makarsankranta

दिव्य मराठी विशेष: संक्रांतीच्या दिवशी आले होते डाॅ. आंबेडकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१४ जानेवारी १९४६ रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापूरला भेट दिली होती. व्हाइसरॉयच्या मंत्रिमंडळात बाबासाहेब मंत्री होते. ऊर्जा, कामगार आणि जल अशा तीन खात्यांचा कारभार त्यांच्याकडे होता. ब्रिटिशांच्या काळातील केंद्रीय मंत्री म्हणून शहरातील सर्व प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आंबेडकरी अनुयायी प्रचंड संख्येने सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर स्वागतास जमा झालेला होते. सकाळच्या मद्रास मेलने बाबासाहेबांचे आगमन झाले. लोकांनी जयघोषात त्यांचे स्वागत झाले. विविध संस्था आणि व्यक्तींनी पुष्पहारांनी बाबासाहेबांचे स्वागत केले. समता सैनिक दलाने त्यांना मानवंदना दिली. मिरवणुकीने फॉरेस्ट येथील हणमंतू गार्ड यांच्या निवासस्थानी आणले. तेथे त्यांचा मुक्काम होता.

सोलापुरातील सावरकर मंडळाने बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार केला. अनेक सावरकरप्रेमी अनुयायी या सत्कार समारंभाला उपस्थित होती. सावरकर मंडळाने मकर संक्रातनिमित्त स्नेहसंमेलनप्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. आपल्या स्पष्ट, निर्भीड आणि जळजळीत शब्दांत सत्कारास उत्तर देताना बाबासाहेब म्हणाले, “आजचा मुख्य प्रश्न स्वराज्याचा नाही. पाकिस्तान हा पन्नास टक्के मुख्य प्रश्न आहे. काँग्रेस स्थापन झाली त्यावेळी पुढे देशाचे तुकडे पाडण्याचा प्रसंग येईल अशी कल्पना नव्हती. उर्वरितपान
गेल्यावीस वर्षांतील राजकारण ज्यांच्या हातात आहे तेच याला जबाबदार आहेत. पण एकाही हिंदूने उठून याबद्दल जाब विचारला नाही. शेकडा ९० टक्के हिंदू मुर्ख आहेत. पॅरिटीचा प्रश्न हा ठिणगी सारखा आहे. एक्झिक्यूटिव्ह पासून मिलिटरी इतर खात्यात हा प्रश्न झपाट्याने पसरेल. अशा गंभीर परिस्थतीत हिंदूंनी विचार करणे अत्यंत जरूरीचे आहे. बाबासाहेबांच्या या भाषणानंतर सावरकर मंडळातील अनेकांना बाबासाहेबांच्या या भाषणाचा परिणाम दिसून आला आणि ते अंतर्मुख होऊन चर्चा करू लागले.”

‘हिंदुस्थान सरकारचा आतापर्यंतचा इतिहास अवलोकन केला तर कर वसुली करणे कायदा व्यवस्था पाहणे ही दोनच ध्येय त्यांच्यापुढे होती. पण अलीकडे त्यात बदल झाला आहे.’ बाबासाहेब पुढे म्हणाले, ‘‘देशातील दारिद्र्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. ते दारिद्र्य नाहीसे करण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. हे कोणीही कबूल करेल. दिल्लीत आज पुनर्घटनेचे कार्य जोरात सुरू आहे. राहण्याची सोय, शिक्षण, उद्योग धंदे यांचे बाबतीत मध्यवर्ती सरकारचे ९० टक्के शक्ती खर्च होत आहे. लाेकल बोर्ड, नगरपालिका यांना मदत देऊन या गोष्टी अमलात आणण्याची सक्ती करण्याचे धोरण आखले जाणार आहे. मजूरमंत्री म्हणून कामगारांचा हिताकडे मी अधिकाधिक लक्ष देत आहे. आगामी मध्यवर्ती असेबंलीमध्ये मजुराचे हिताचे १० बिले येणार असून तो ड्राप्ट तयार झालेला आहे. बाबासाहेबांच्या भाषणात लोक प्रतिनिधींनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.”

तिसरा कार्यक्रम इंडियन फेडरेशन ऑफ लेबरच्या स्थानिक शाखेचे प्रमुख कॉ. पी.जी. बेके रॅडिकल पार्टीचे सेक्रेटरी डॉ. के. बी. चिंदरकर यांनी बाबासाहेबांनी मुलाखत घेतली. रॅडिकल पार्टीची भूमिका एम. एन. रॉय यांची बदलत गेलेली राजकीय भूमिका या संबंधी मुलाखतीत चर्चा झाली.

सायंकाळी बी. सी. होस्टेलच्या मैदानावर बाबासाहेबांची जाहीर सभा झाली. प्रचंड मोठा जनसमुदाय जमलेला होता. आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले, ‘निवडणुकीबाबत माझ्या अस्पृश बांधवांना दोन शब्द सांगण्याची जरूरी वाटत नाही. माझ्या समाजावर माझा संपूर्ण विश्वास आहे. येणारी निवडणूक हा संग्राम आहे, हे युध्द आहे. कौरव पांडवांप्रमाणे ही लढाई होणार आहे. सुईच्या अग्रावरील मातीसुद्धा पांडवांना मिळणार नाही. दुर्योधनाने कृष्ण शिष्टाईच्या वेळी त्यांना सुनावले.

युद्ध टाळावे म्हणून मी गांधींना पत्र लिहून तडजोडीचे प्रयत्न केले. आपला सन्मान खिशात ठेवून मी समाजाच्या हितासाठी पुढारपणाची पर्वा करता राऊंड टेबल परिषदेतल्या सामान्यांची पुनरावृत्ती होऊ नये. वितुष्ट वाढू नये म्हणून उभयतांनी राजकीय मागण्यांची तजवीज करावी यासाठी गांधींना पत्र लिहिले. तुमच्या आमच्यात समदृष्टिकोन नाही असे गांधींनी उत्तर देऊन माझी समझोत्याची मागणी अमान्य केली. मी पत्र लिहिण्यापूर्वी काही महिन्यांपूर्वी हेच गांधी जीनांचे घरी जाऊन त्यांचे गळ्यात गळा घालत होते. मी विचार केला, गांधी जीनांना भेटतात तर मलाही भेटतील. गांधी जीनांमध्ये कोणता समदृ़ष्टिकोन होता हे राजकारण तज्ज्ञानांच माहीत. दुर्योधनाने सांगितल्याप्रमाणे सुईच्या अग्रावरील मातीही अस्पृशास देण्यास गांधी तयार नाहीत. आमचा खरा लढा काँग्रेसशी आहे. मुसलमान जे मागतात ते काँग्रेस त्यांना देते. मुस्लमान शेकडा २५ टक्के आहेत. त्यांना शेकडा तेहतीस पूर्णांक एकद्वितीअंश जागा कबुल आहेत. आता ते ५० टक्के मागणी करतात. तेही द्यावयास सिमला परिषदेच्या वेळी काँग्रेसवाले सिद्ध झाले. आमचा वाजवी हक्क असताना आम्हाला काय उत्तर? सूईच्या अग्रावर माती राहील, तेवढीही मिळणार नाही. पुनरूपी पेशवाई येऊ द्यायची नसेल तर तुम्ही जागृत राहिले पाहिजे. मी या निवडणुकीत मुंबई असेम्बली करता तुमच्या जिल्ह्यात जीवप्पा ऐदाळेला उभे केले आहे. जीवप्पा केवळ निमित्तमात्र आहे. सर्व काही मी आहे. मला मते द्या. विद्वान, कर्तृत्त्ववान माणसे नसली तरी मला चालतील, पण निष्ठेची माणसे हवीत. विद्येचा तुटवडा मी भरून काढण्यास खंबीर आहे. जो विकला जातो, लोभाला बळी पडतो त्याचा काही उपयोग नाही. आपल्यावर भावी पिढीवर येणारे संकट नाहीसे करून पुढच्या पिढीचा मार्ग सुकर करणे आपले कर्तव्य आहे.

बाबासाहेबांच्या या भाषणानंतर जमलेल्या अनुयायात चैतन्य आले. ७० वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी सोलापुरात येऊन वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन संवाद साधला. संक्रात दिवशी यात्रा असते. या यात्रेत खेड्यापाड्यांतील लोक एकत्र येतात. त्या पार्श्वभूमी विजापूर, गुलबर्गा, उस्मानाबाद जिल्ह्यांतील अस्पृश्य समाज प्रचंड संख्येने उपस्थित होता. त्यांनी बाबासाहेबांना पाहिले, त्यांना ऐकले. बाबासाहेबांची सोेलापूरची ही शेवटी भेट होती.

कार्याची मुहूर्तमेढ सोलापुरातूनच
मानपत्रासउत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मला मानपत्रे अर्पण केल्याबाबत मी अत्यंत आभारी आहे. सोलापूर शहरास मी अपरिचीत नाही. येथे बऱ्याच वेळा मी आलेलो आहे. राजकारण समाजकारण याचा प्रचारही केलेला आहे. खरे पहिले तर सार्वजनिक कार्याची मुहूर्त सोलापुरातच मी रोवली. कै. डॉ. रावबहादूर मुळे यांनी अस्पृशांसाठी बोर्डिंग उघडले त्यांचेच कार्य त्यांचे बंधू डॉ. भालचंद्र उर्फ काकासाहेब मुळे यांनी उत्तम प्रकारे चालवले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.

मुळे सभागृहात दिले होते मानपत्र
बाबासाहेबआंबेडकर हे एक दिवसासाठी सोलापुरात आले होते. संपूर्ण दिवस त्यांचे कार्यक्रम झाले. सर्वप्रथम हरिभाई देवकरण प्रशालेतील मुळे सभागृहात सोलापूर नगरपालिका आणि जिल्हा लोकल बोर्डने बाबासाहेबांना मानपत्र दिले. सोलापूर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष रा. ब. नागप्पाअण्णा अब्दुलपूरकर यांनी मानपत्र वाचले, ते बाबासाहेबांना अर्पण केले. जिल्हा लोकल बोर्डचे मानपत्र लोकल बोर्डचे अध्यक्ष जी. डी. साठे यांनी वाचले, ते मानपत्र बाबासाहेबांना अर्पण केले.
- दत्ता गायकवाड, सामाजिक चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक