आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तळपत्या उन्हातही अलोट गर्दी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी भीमजागर सुरू झाला. डाॅ. आंबेडकर (पार्क) चौकातील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनतेने अलोट गर्दी केली. सकाळपासून भीमसैनिकांचे जत्थे येत होते. डोक्यावर उन्हाचा कडका असूनही दर्शन घेण्यासाठीचा उत्साह कायम हाेता.
 
जयंतीनिमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समता पंधरवाडा साजरा होणार आहे. शुक्रवारी सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. गुरुवारी मध्यरात्री बाराचा गजर होताच युवक, राजकीय नेते, संस्थांचे प्रमुख यांनी पुतळ्याकडे अभिवादन करण्यासाठी धाव घेतली. दुचाकीस्वारांची गर्दी झाली होती. राज्यघटनेचा निर्माता, दीनदलितांचा मुक्तिदाता, महामानव अशा नाना उपाधी लेखक, कवींनी बाबासाहेबांना दिल्या. त्याचा उल्लेख ध्वनिक्षेपकावर वाजणाऱ्या भीमगीतांमधून होत होता. शहरातील ठिकठिकाणी, चौकाचौकात मंडळांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहर निळ्या रंगात रंगल्यासारखे दिसत होते. पांढरे कपडे, डोक्यावर निळी टोपी धारण केलेले नागरिक जय भीमचा नारा देत होते. बुधवार पेठ, मिलिंदनगर, सम्राट चौक, कुमठा नाका, जोडभावी पेठसह शहराच्या अनेक भागांत जल्लोष पाहायला मिळाला. 
 
महापालिकेच्या वतीने महापौर शोभा बनशेट्टी यांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, रीपाइंचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, उपमहापौर शशिकला बत्तुल, दैदिप्य वडापूरकर, आनंद चंदनशिवे, नगरसेविका राधिका पोसा, विजय पुकाळे आदी उपस्थित होते. 
 
वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नेटके नियोजन 
विविध संस्था संघटनांनी सामाजिक उपक्रम प्रबोधन करून आंबेडकर जयंती साजरी केली. डाॅ. आंबेडकर चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शिवाजी चौकाकडून येणारी वाहतूक सिद्धेश्वर मंदिराकडे तर डफरीन चौकाकडून येणारी वाहतूक शुभराय आर्ट गॅलरीकडे वळवण्यात आली. पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी बंदोबस्ताची पाहणी केली. 
 
शहरात विविध कार्यक्रम 
जयंतीच्या निमित्ताने विविध भागात मंडळ संस्थांतर्फे पाणीवाटप, खाऊ वाटप, अभ्यास, साडी वाटप, जन्मलेल्या मुलीच्या नावाने ठेव ठेवणे, विद्यार्थी दत्तक, गरीब विद्यार्थ्यांना मदत, रुग्णांना मदत, रक्तदान शिबिर, चष्मा वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले. 
 
सर्वधर्म समभावाचा जुळून आला सुंदर योग 
१४ एप्रिल या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, गुडफ्रायडे, संकष्टी चतुर्थी, मुस्लिमांचा जुम्मा नमाज दिवस पारसी मासारंभ दिनही असल्याने सोशल मीडियावर सर्वधर्म समभावाचे संदेश फिरताना दिसत होते. त्यामुळे एकोपा जपण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला गेला. 
 
४०० मंडळांचा सहभाग 
- शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ जयंती उत्साहात साजरी होत आहे. दहा दिवस विविध उपक्रम घेतले जातील. जयंती उत्सवात ४०० मंडळे सहभागी असून, विविध उपक्रम घेऊन जयंती साजरी करत आहेत. दहा दिवसांच्या उत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. तसेच पोलिस प्रशासनाकडून योग्य ते नियोजन केले आहे.
सूरजसाबळे, मध्यवर्ती जयंती उत्सव समिती 
 
शहराच्या मध्यवर्ती भागातील डाॅ. आंबेडकर चौकातील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पहाटेपासूनच भीमप्रेमींची मोठी गर्दी होती. तरुण मंडळांचे कार्यकर्ते गटागटाने येत होते. अनेकजण सहकुटुंब येत होते. चौकातील पदपथावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संदेशावरील पुस्तकांचे स्टाॅल्स लागले होते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...