आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक जमा करणारे डॉ. विकास आमटे म्हणाले, ‘मी भंगारचा ठेकेदार’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ज्या वस्तू वापरूच नये, त्या वापरल्या की त्याचा पुनर्वापर व्हावा, या हेतूनेच प्लास्टिक जमा केले. त्यापासून वीजनिर्मिती केली. इतकेच काय रस्तेही बनवले. या गोष्टीमुळे मी स्वत:ला भंगारचा ठेकेदार समजतो. पण त्यातून पर्यावरणपूरक गोष्टी होतात, याचा आनंद वेगळा. आनंदवन ही जगातील घाण जागा. ती स्वच्छ करण्याच्या कामातील हे एक मिशन होते... डॉ. विकास आमटे सांगत होते. ‘आनंदवन प्रयोगवन’मधील किस्से सांगत होते. निमित्त होते प्रिसिजन गप्पांचे... 

शनिवारी समारोपात डॉ. आमटे यांची मुलाखत झाली. मंदार परांजपे यांनी ती घेतली. हेमलकशातील कुष्ठरुग्णांच्या वेदना, सामाजिक स्थिती आणि बाबांची सेवा या सर्व बाबींना स्पर्श करत डॉ. आमटे बोलत होते. पुढे म्हणाले, “आनंदवनात बाबांसोबत काम करताना अनेक वेदनादायी दृश्ये पाहिली. अंगावर कपडेच नाहीत. रात्री विस्तवाभोवती गुरांसारखी झोपणारी माणसं होती. हातांची बोटे म्हणजे भळभळणाऱ्या जखमा. त्या स्वच्छ करून बँडेज केले की, ते स्वच्छ कापड काढून लंगोट तयार केले जाई. अशा या आनंदवनात स्वच्छता, आरोग्य पर्यावरणपूरक गोष्टी केल्या. तो देशातील एक मॉडेल ठरला आहे.” 

पुरस्कारांचे वितरण 
प्रिसिजनसामाजिक कृतज्ञता पुरस्कार आणि सुभाष शहा स्मृती पुरस्कार असे दोन पुरस्कार या वेळी देण्यात आले. पहिला पुरस्कार हा जेऊर (ता. अक्कलकोट) येथील जीवनज्योती महिला संस्थेला देण्यात आला. त्याच्या प्रमुख रूपाली कणमुसे, इरण्णा कणमुसे यांनी तो स्वीकारला. स्फटिकांचे कमळ आणि तीन लाख रुपये असे त्याचे स्वरूप होते. दोन लाख रुपयांचा शहा स्मृती पुरस्कार महारोगी सेवा समिती (वरोरा)ला देण्यात आला. कौस्तुभ आमटे यांच्या वतीने तो डॉ. विकास आमटे यांनी स्वीकारला. 

यांचाही झाला सन्मान 
यासोहळ्याच्या निमित्ताने क्रीडा, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला. त्यात कर्णबधिर, बुद्धिबळपटू निहार कुलकर्णी, स्वराली, नाट्य क्षेत्रातील अमीर तडवळकर, सामाजिक कार्यकर्त्या भक्ती जाधव, शिक्षक परवेझ शेख आणि वैशाली कार्वेकर यांचा समावेश होता. 

दिवाळीची ही भेट 
सॅनिटरी नॅपकीनचे उत्पादन करताना अनंत अडचणी आल्या. मनाने खचून गेले. अक्षरश: हरले होते. परंतु प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा आल्या. एक ज्वालामुखी आल्यासारखेच वाटले. त्यानंतर त्यांनी जी मदत केली, त्याचे शब्दांत वर्णन करता येणार नाही. हा पुरस्कार म्हणजे दिवाळीची गोड भेट आहे.
- रुपाली कणमुसे, अध्यक्षा, जीवनज्योती महिला संस्था 

सुभाष शहा स्मृती पुरस्कार डाॅ. विकास आमटे यांना देताना यतीन शहा, डॉ. सुहासिनी शहा, सौ. मयुरा आणि करण शहा. (दुसऱ्या छायाचित्रात) प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार स्वीकारताना रूपाली कणमुसे आणि इरण्णा कणमुसे. 
बातम्या आणखी आहेत...