आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंमली पदार्थाचा गोरखधंदा: ड्रग्ज तस्करीचा सूत्रधार पुनित अखेर गजाआड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- चिंचोली एमआयडीसी भागातील एव्हाॅन कंपनीत इफेड्रिन या अमली पदार्थाचा सुमारे दाेन हजार काेटींचा साठा सापडला होता. याप्रकरणातील मुख्य संशयित पुनित रमेश श्रींगी (वय ४६, रा. विरार, मुंबई) याला अटक करण्यात ठाणे पाेलिसांना मंगळवारी यश अाले. गुजरातमध्ये ड्रग्जचे रॅकेट उघडकीस अाल्यानंतर त्यामागे पुनितच मुख्य सूत्रधार असल्याचे समाेर अाले. १६ एप्रिलपासून पाेलिस त्याचा शाेध घेत हाेते.

अमली पदार्थाची तस्करी करताना अहमदाबाद पोलिसांनी हे प्रकरण उजेडात अाणले. या तस्करीचे धागेदाेरे ठाणे, साेलापूरपर्यंत अाले हाेते. सोलापुरातील एव्हाॅन कंपनीत ‘इफेड्रीन’ हे ड्रग्ज तयार करण्यात येत होते. त्याचा वापर अमली पदार्थ तयार करण्यासाठी करण्यात येत होता. पुनित हा मागील एक वर्षापासून या कंपनीचा संचालक म्हणून काम पाहात अाहे. अनेकदा तो मुंबईला जाताना अापल्या कारमधून काही टन अमली पदार्थ न्यायचा. कंपनीतील कामगार स्वामी याची त्याला साथ होती. ठाणे पोलिसांनी याप्रकरणात अात्तापर्यंत पाचजणांना अटक केली अाहे. पुनित याला बुधवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस अायुक्त भरत शेळके यांनी दिली.

मंजुरी नसताना जादा इफेड्रिन (अमली पदार्थ) बाळगून त्याची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी चिंचोळी औद्योगिक वसाहतीतील एव्हॉन लाइफ सायन्स लिमिटेड या कंपनीच्या मालक आणि संचालक अशा सहा जणांविरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे चेअरमन अजित कामत, राजंेद्र कैमल, मनोज जैन, सुनील पित्रोडा, कोमल सुशील तिबरेवाल, झीनत सईद पठाण अशी या संशयितांची नावे आहेत.

एव्हॉन कंपनीच्या संशयित मालक संचालकांनी मार्च २०१२ रोजी आठ हजार ५०० किलोग्रॅम आणि २६ सप्टेंबर २०१४ रोजी १३ हजार किलो अशी २१,५०० किलो इफेड्रिनची परवान्यानुसार मंजुरी नसताना दोन वेळा बेकायदा विक्री केली. या अमली पदार्थाची किंमत ४५ लाख आहे. तसेच सप्टेंबर २०१३ मध्ये ऑगस्ट २०१८ मधील म्हणजे मुदतबाह्य औषधाचे उत्पादन केल्याचे कागदपत्रांत नमूद आहे. या औषधाचा ४.७ किलोग्रॅम इतका साठा कंपनीकडे शिल्लक असल्याचे भांडार कक्षाच्या नोंदवहीत दाखवले आहे. मात्र, प्रत्यक्षात हा औषधाचा साठाच नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे. तसेच एव्हॉन कंपनीचे मालक संचालक यांनी उत्पादनाविषयी एफ फॉर्ममध्ये झोनल डायरेक्टर, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांना तिमाही माहिती पाठवणे आवश्यक असताना जुलै ते सप्टेंबर २०१३ मध्ये उत्पादित केलेल्या इफेड्रिन एचसीएलआयपी या औषधाबाबत वस्तुस्थितिदर्शक माहिती पाठवली नसल्याचे निदर्शनास आले.

पथक तळ ठाेकून
ठाणे पोलिसांचे एक पथक अजूनही कंपनीत तळ ठोकून अाहे. कागदपत्रांची तपासणी करणे, जबाब घेणे, पंचनामा करणे हे काम सुरूच अाहे. अातापर्यंत पोलिसांनी २३ टन ईफेड्रीन पावडर जप्त केले अाहे. कंपनीतील कामगार धनेश्वर स्वामी उत्पादक विभागाचा मॅनेंजर राजेंद्र डिमरी (रा. दोघ सोलापूर) रायगड जिल्ह्यातील सागर पोवळे, मयूर सुखदरे या चौघांना अटक केली असून ते कोठडीत अाहेत.