आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पा अन् गौरींची इकोफ्रेंडली सजावट करणारे भक्त, साकारतात वेगवेगळ्या सुंदर संकल्पना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आपल्या हातच्या नाजुक कौशल्याला देवाच्या चरणी लीन करते. फुले, पानं, रांगोळी या विविध प्रकारच्या वस्तू पासून ती गौरीगणपतीच्या आरासाचे काम करते. त्यात नव्या प्रकारच्या संकल्पनाही आणते. ही आहे पुणे- मुंबईच्या धर्तीवर काम करणारी श्रद्धा बायस. सोलापूरच्या कलाकुसरीच्या क्षेत्रात वेगळ्या प्रकारचा विचार या मार्गाने ती आणत आहे.
रांगोळीचे ताट

विविध प्रकारच्या संकल्पना महिला गौरीच्या वेळी अमलात आणतात. त्यात विविध रंगांचा वापर करता येतो. रांगोळी हे गौरींच्या वेळचे एक आकर्षण असते. रांगोळीच्या साह्याने केले जाणारे रांगोळीचे औक्षणाचे ताट कुणीही पाहिले नसेल. तसे ताट श्रद्धा स्वत: तयार करते. त्याला नक्षीने आणि रंगाने सजविते. त्यावर पाने-फुले यांचा वापरही करते.
फुलांचे आसन
गणपतीबाप्पांच्या मूर्तीच्या जशा संकल्पना सुचतात, त्याच मूर्तीचे अवलोकन करून श्रध्दाने स्वत:च्या आविष्कारातून विविध प्रकारची आसनं आविष्कृत केली आहेत. त्यात झेंडू, शेवंती, गुलाब, डेकोरेटिव्ह फुले, झुरमुळ्या, लेस, काही वेळेस केळीचे पान, नारळाचे पान, कुन्दन काच आणि विविध वस्तूंच्या साह्याने ती हे काम करते. त्या आसनावर बाप्पांचे रूप अजूनच मोहक दिसू लागते.
फुलांचे पडदे आणि झुंबर
ज्याप्रकारचे फूल आवडते त्यांना तशा फुलांचे पडदे आणि झुंबरही करून सजावट करण्यात येते. काही ठिकाणी संपूर्ण मांडव केवळ फुलांच्या पडद्यांनी विणला जातो, तर काही वेळेस पानांच्या आाणि गुलछडी किंवा निशिगंधाच्या फुलांनी विणला जातो. तशा प्रकारच्या सजावटीत श्रध्दाचा हात उत्तम कला करणारा आहे. ती या प्रकारच्या पडद्यांना रंग देऊन त्या-त्या बाप्पाच्या गौरींच्या रंगानुसार रंग देते आणि त्यांचे आकर्षण वाढविण्याचे काम करते.

पानांच्या आणि फुलांच्या तटबंदी
घट्ट आणि गळणाऱ्या फुलांचे तट आणि पानांचे पार्टीशन करून मांडवही तयार करण्यात तिचा हातखंडा आहे. ती या संकल्पनेतून विविध प्रकारच्या इको मांडव आणि तट तयार करते. या मांडवांचे आकार नेहमीपेक्षा थोडे छोटे असतात. त्यात फुलांनी केलेले तट खुप सुंदर आणि आकर्षक दिसतात.
रंग आविष्कार
रांगोळीत मोती, चमकी आदी सजावटी वस्तूंचा समावेश करून संकल्पना प्रत्यक्षात उतरविते. त्यात पुन्हा नक्षी आणि रंगांचा आविष्कार निर्माण करते. त्या साध्या आणि मोहक दिसण्यावर तिचा भर असतो. पुन्हा त्यात काही देखण्या वस्तू, दिवे ठेवून कलाकुसर करते आणि त्याप्रमाणे सजावट करते. त्यास मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते.

वेगळेपणाची आवड
- काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न नेहमी असतो. कलाकुसरीचे काम सोपे नसते. त्यात मजा असते तसेच त्रासही असतोच. गौरीगणपती लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लोक वेळ आणि पैसा सजावटीसाठी खर्च करतात. त्यापेक्षा निर्सगाने दिलेल्या वस्तू, त्यांचे महत्त्व ओळखून सजावट करा. जसा बाप्पा इकोफ्रेंडली आणता तशी सजावटही इकोफ्रेंडली करा.”
श्रद्धा बायस, कलाकार