आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीमुळे गावपुढाऱ्यांचा आयत्या स्वच्छतागृहांकडे कल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - ग्रामीणभागात उघड्यावर शौचास जाणारांची संख्या मोठी आहे. प्रत्येक गावात प्रवेश करताना याचे "दर्शन' झाल्याशिवाय राहात नाही. शासनाकडून व्यापक जनजागृती करूनही अनेकांनी स्वच्छतागृहांच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले. परंतु, आता ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी स्वच्छतागृहाचा वापर करत असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. त्यातच अर्ज दाखल करण्यास कमी कालावधी शिल्लक राहिल्याने गावपुढाऱ्यांकडून थेट आयत्या स्वच्छतागृहांची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे स्वच्छतागृहांच्या व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.

जिल्ह्यातील ४२२ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. १३ जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. २० जुलै ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने उमेदवारांची कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. निवडणूक लढवण्यासाठी स्वच्छतागृहांची अट घातल्याने उमेदवारांची चांगलीच पंचायत झाली आहे. शासनाकडून स्वच्छतागृहे बांधावी यासाठी विविध योजना राबवण्यात आल्या. तरीदेखील अनेकांकडे स्वच्छतागृह नाही. त्यामुळे निवडणुकीत अर्ज करण्यासाठी अडचण येत आहे. यावर मात करण्यासाठी उमेदवारांनी शक्कल लढवली असून, रेडीमेड स्वच्छतागृह खरेदी करण्यात येत आहे. उस्मानाबाद शहरासह लातूर येथून स्वच्छतागृहे आणण्यात येत आहेत.मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांनी स्वच्छतागृह बांधल्याने स्वच्छतागृह असूनही त्याचा वापर करणाऱ्या जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व जिल्हा प्रशासनाकडून रद्द ठरवण्यात आले होते. त्यानंतरही या सदस्यांनी स्वच्छतागृह बांधण्याकडे लक्ष दिले नाही. आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर कागदपत्रांची जुळवाजुळव करताना उमेदवारांची दमछाक होत आहे. घरपट्टी, नळपट्टी भरून उमेदवार बेबाकी प्रमाणपत्र घेत आहेत. परंतु, स्वच्छतागृहांचा वापर करण्याबाबतचे प्रमाणपत्र ग्रामपसेवकांकडून घेणे आवश्यक आहे. ग्रामसेवकांनाही वरिष्ठ पातळीवरून स्वच्छतागृह असणाऱ्यांनाच प्रमाणपत्र द्यावेत, असे स्पष्ट निर्देश दिल्याने ग्रामसेवकही प्रत्यक्ष पाहणी करूनच स्वच्छतागृह आहे का, याची तपासणी करत आहेत. त्यानंतरच उमेदवारांना प्रमाणपत्र देत आहेत. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत स्वच्छतागृह बांधणे शक्य नसल्याने उमेदवार रेडीमेड स्वच्छतागृह खरेदी करत आहेत.

आता तरी वापर करा
ग्रामीणभागात उघड्यावर प्रात:विधीसाठी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. प्रत्येक गावात प्रवेश करताना हे चित्र दिसून येते. या प्रकाराला अळा घाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण स्वच्छता विभागने यापूर्वी गुड मॉर्निंग मोहीम रावबून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे केले. अनेकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. त्यानंतरही स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्याकडे ग्रामस्थांनी कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. अजूनही उघड्यावर शौचास जाणाऱ्या महिलांसह पुरुषांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आता तरी स्वच्छतागृहांचे बांधकाम करून त्याचा वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

यापूर्वी दरमहा सरासरी २५ स्वच्छतागृहांची विक्री होत होती. आता केवळ दहा दिवसांत ५० स्वच्छतागृहांची विक्री झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना स्वच्छतागृहाचा वापर बंधनकारक केल्यामुळेच विक्रीत वाढ झाली आहे.'' युवराजनळे, उद्योजक

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेडिमेड स्वच्छतागृहांना मागणी वाढली आहे. माझे युनिट लहान आहे. यापूर्वी महिन्यातून एखाद-दुसऱ्या स्वच्छतागृहाची विक्री होत होती. आता निवडणुकीमुळे केवळ पाच दिवसात १५ स्वच्छतागृहांची विक्री झाली आहे.'' दत्तात्रयनवले, उद्योजक

तहसील आवारात गर्दी
उमेदवारीअर्ज दाखल करण्यासाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी उमेदवारांची उस्मानाबाद येथील तहसील कार्यालय परिसरात बुधवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. जात पडताळणी प्रस्तावासाठी खासरा पाहणी प्रमाणपत्र काढणाऱ्यांची संख्या जास्त होती. शिवाय अनेक उमेदवारांनी अद्याप जात प्रमाणपत्रच काढले नसल्याने त्यासाठीही गर्दी दिसून आली.

गावकारभाऱ्यांत स्पर्धा
गावकारभारीहोण्यासाठी गावा-गावांत जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र दिसून येत आहे. आरक्षित जागेवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून जात पडताळणी करण्यासाठी धावपळ करण्यात येत आहे. शिवाय सर्वच उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज करण्याकडे लक्ष दिले आहे. त्यातूनच उमेदवारांकडून रेडिमेड स्वच्छतागृहांना पसंती देण्यात येत आहे.

बिनविरोधच्या विश्वासार्हतेला ऑनलाइनमुळे तडा
यापूर्वीग्रामपंचायतनिहाय कोणत्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला, याची माहिती प्रत्येक दिवशी दुपारी तीननंतर निवडणूक विभागाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात येत होती. परंतु, यावेळी प्रथमच अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे कोणी, कोठून अर्ज भरला हे समजत नसल्याचे तहसीलकडून सांगण्यात आले. त्यामुळे गावपातळीवर खेळल्या जाणाऱ्या राजकीय खेळीवर निर्बंध आले आहेत. तसेच अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुकीची चर्चा सुरू असताना गावातील अति उत्साही उमेदवार गुपचूप येऊन अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळे गावात बिनविरोधची चर्चा सुरू असताना अशा प्रकारांमुळे विश्वासार्हतेला धोका पोहोचत आहे. ऑनलाइनमुळे उमेदवारांची माहिती निवडणूक विभागातून उपलब्ध होत नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.
बातम्या आणखी आहेत...