आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येणकीत वीज धक्क्याने वडील आणि मुलाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मोहोळ तालुक्यातील येणकी येथे शेतात गवत काढण्यासाठी गेल्यानंतर मुलाला विजेचा धक्का बसला. त्याला वाचवताना वडिलांनाही विजेचा धक्का बसल्यामुळे दोघेजण मरण पावले. दुसरा मुलगा मात्र जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी चारला घडली. सुरेश दत्तात्रय भोसले (वय ४०), राहुल सुरेश भोसले (वय १२, रा. दोघे इंचगाव, ता. मोहोळ) या दोघांचा मृत्यू झाला.

हनुमंत भोसले (वय १४) हा जखमी झाला. भोसले परिवार शेतातील वस्तीवर राहतो. ते मोलमजुरी करून उपजीविका करतात. राहुल, हनुमंत या दोन मुलांसह वडील सुरेश हे येणकी परिसरातील घोडके यांच्या शेताजवळ गवत आणण्यासाठी गेले होते. एका लोखंडी तारेत वीजप्रवाह आल्यामुळे राहुलला विजेचा धक्का बसला. त्याला वाचवण्यासाठी सुरेश गेल्यानंतर दोघांना जबर धक्का बसला. त्यांच्या मदतीला हनुमंत गेल्यानंतर तोही जखमी झाला. शेजारील लोकांनी वीजप्रवाह खंडित करून तिघांना उपचारासाठी सोलापूरला हलवले. राहुल सुरेश हे उपचारापूर्वीच मरण पावले होते. हनुमंतवर उपचार सुरू आहेत. राहुल हनुमंत हे येणकी येथील जकराया या शाळेचे विद्यार्थी आहेत.