आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साठऐवजी चाळीस फूट रस्ता केला, आता अतिक्रमण काढण्याचे सुचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सम्राट चौक ते कोंतम चौक रस्ता सुमारे साठ फूट रुंदीचा अपेक्षित होता. मात्र, तो काही ठिकाणी सुमारे ४० तर काही ठिकाणी ४५ फूट रुंदीचा करण्यात आला. त्यासाठी अतिक्रमणाची सबब देण्यात आली. मात्र, महापालिकेने वेळेत अतिक्रमण काढून कामासाठी रस्ता मोकळा करून दिला नाही. रस्ता झाल्यानंतर आता अतिक्रमण काढण्याचे काम सुरू आहे. ठरलेल्या रुंदीप्रमाणे रस्ता होत नसल्याची तक्रार आल्यानंतर चौकशी करण्यात आली. ती अहवालाच्या फाइलीतच अडकलेली आहे.
रस्त्याच्या कामांतर्गत शिवगंगा मंदिर ते बलिदान चौकापर्यंत रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढण्याचे काम सुरू झाले अाहे. अाधी रस्ता अन् मग अतिक्रमण असा उलटा प्रवास महापालिकेकडून होताना दिसतो अाहे. तर सात रस्ता ते रूपाभवानी रस्ता मुळातच अर्धवट अाहे, जो झाला अाहे त्यालाही वर्षे उलटून गेले. अाता लेअर टाकण्याचे काम सुरू अाहे.

या रस्त्याची रुंदी कुठे कमी तर कुठे जास्त होती. तर काही ठिकाणी असलेले अतिक्रमण काढता रस्त्याचे काम केले जात होते. रस्त्याच्या दर्जाबाबतही नागरिकांनी संशय व्यक्त केला होता. याविषयी ‘दिव्य मराठी’ने त्या रस्त्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून रुंदी तपासून बघितली होती. तसेच रस्त्याची गुणवत्ता सुध्दा तपासली होती. इतकेच नव्हे तर याचा तपास अहवाल आयुक्तांपुढे सादर करण्यात आला होता. या अहवालामध्ये काय आहे आणि यावर निर्णय काय घेणार याबाबत माहिती देण्यास संबंधित विभागाचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. रस्ता अरुंद कसा झाला? त्याची जबाबदारी कोणावर? कारवाई काय हे सर्व फाइलीतच राहिले अाहे. कसाबसा हा रस्ता पूर्ण करण्याकडे कल िदसतो अाहे.

रस्त्याच्या एका कडेला असलेले अतिक्रमण काढून तेथील रस्त्याचे काम केले जात आहे. हेच काम आधी केले असते तर एकत्रित रस्ता झाला असता. महापालिकेने रस्ता बांधणीचा हा अाता उलटा प्रवास सुरू केला अाहे.

सात रस्ता ते रूपाभवानी रस्ताही अर्धवट
सातरस्ता ते रूपाभवानी मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या शेवटच्या टप्प्याचे काम सुरू झाले अाहे. वाहतुकीस होणारा त्रास टाळण्यासाठी रस्त्याचे काम रात्री केले जात आहे. सात रस्ता, रंगभवन, विजापूर वेस, माणिक चौक, बलिदान चौक, रूपाभवानी मंदिर ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत हा रस्ता होणार आहे. हा रस्ता ३.९० किलोमीटरचा असून याच्या कामासाठी १९ कोटी ३१ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. कामाचा मक्ता युनिटी इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीकडे देण्यात आला आहे.

चौकशी अहवाल आला, पुढे काहीच नाही
सध्याशिवगंगा मंदिर ते बलिदान चौकापर्यंत रस्त्याच्या उजव्या बाजूचे अतिक्रमण काढले जात आहेत. तसेच फुटपाथ पाडून रस्त्याची रुंदी वाढविली जात आहे. सध्या या रस्त्याची रुंदी ४० ते ४५ फूट आहे. रुंदी वाढवून हा रस्ता सुमारे ६० फूट करण्यात येणार आहे. यात ५० फूट रुंद रस्ता आणि दुतर्फा पाच-पाच फूट रुंदीचे पदपथ असणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर बलिदान चौक ते कुंभार वेस ते कोंतम चौकापर्यंतचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. नियोजनापेक्षा रुंदी कमी ठेवून काम झाल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर चौकशी झाली. पुढे कारवाईचे काहीच झाले नाही.
बातम्या आणखी आहेत...