आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४२६ गावांतील ४७ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - गेल्या दोन आठवड्यांत झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार ७७७ हेक्टरवरील पिके बेचिराख झाली आहेत. अतिवृष्टी झालेल्या ३० महसूल मंडळातील ४२६ गावांना याचा फटका बसला असून याचा प्राथमिक नजरअंदाजे अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. अवर्षणाच्या फटक्यात अगोदरच पिकांचा धुराळा झाल्यामुळे नुकसानीचा आकडा कमी आहे.
गेल्या दोन आठवड्यापूर्वीपासून जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातले. यापूर्वी पावसाने सुमारे २६ दिवस ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या अवर्षणाच्या फटक्यात अगाेदरच पिके करपून गेली होती. यातून कशी तरी पाणी देऊन पिकांची शेतकऱ्यांनी जोपासना केली होती. मात्र, नंतर झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे जोपासलेली पिकेही नेस्तनाबूत झाली आहेत. या सर्व पिकांची कृषी विभागाच्या वतीने नजरअंदाजे प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. पाहणीत गंभीर बाब समोर आली असून अंदाजानुसार सर्वच तालुक्यातील बहुतांश पिकांना अतिवृष्टीमुळे चांगलाच फटका बसला आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यात ३० महसूल मंडळे सापडली आहेत. या मंडळातील ४२६ गावांच्या शिवारांना फटका बसला आहे. सोयाबीन, तुर, उडीद, मुग आदींसह सर्वच पिकांच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये एक लाख ४७ हजार ७७७ हेक्टरवरील सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. सुरुवातीच्या काळात तुषार सिंचनासारखा योग्य वेळी पाऊस पडलेला असल्यामुळे पिके तरारुन आली होती. नंतर सुमारे २६ दिवस एक थेंबही बसरसला नाही. यातूनही काही पिके वाचली होती. ती सर्व पिके आता नष्ट झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची मानसिकता ढासळली आहे. यापार्श्वभूमीवर तातडीने मदत मिळण्याची आवश्यकता आहे.

उमरगातालुक्यात अधिक फटका :उमरगा, लोहारा तुळजापूर तालुक्याला दोन टप्प्यात अतिवृष्टीचा दणका बसला आहे. यामुळे येथील नुकसानाची आकडेवारी मोठी आहे. अनुक्रमे ३८ हजार ६३०, २९ हजार ३३१, ३७ हजार तीन हेक्टरवर नुकसान झाले आहे. कळंब तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ५९३, उस्मानाबाद तालुक्यात चार हजार २१८ हेक्टर नुकसान झाले आहे. कारण या दोन्ही तालुक्यातील पिके अवर्षणामुळे अगोदरच करपून गेली आहेत.

पीक विम्याचा फायदा नाही
प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी पीकविमा योजनेतून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद नाही. केवळ भुस्खलन झालेल्या जमिनी नदी, नाले ओढ्यांच्या पुरामुळे बांधित झालेल्या जमिनीतील पिकांच्या नुकसानापोटी भरपाई मिळू शकेल. यामुळे अतिवृष्टी बाधितांना केवळ शासनाच्या मदतीशिवाय आता पर्याय नाही.

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अपेक्षित
विरोधी पक्ष संघटनांनी झालेल्या नुकसानीपोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांसह विविध पक्षातील नेत्यांनीही यासंदर्भात अनुकूलता दर्शवली आहे. यामुळे मंगळवारी (दि. ४) होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होण्याची अपेक्षा आहे.

तालुकानिहाय गावे, नुकसान
तालुका गावे नुकसान (हेक्टर)
उस्मानाबाद२० ४,२१८
तुळजापूर ११६ ३७,००१
उमरगा ९६ ३८,६३०
लोहारा ४७ २९,३३१
भूम ४० १०,१६३
परंडा ६७ १३,८००
कळंब २२ ५९३
वाशी १८ १४,०३९

^शासनाकडे अहवालपाठवण्यासाठी नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. भूसख्खन पूरातील नुकसान सोडले तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला विमा योजनेतून भरपाईची तरतूद नाही. -शिरीष जमदाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक.
बातम्या आणखी आहेत...