आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक कामास रिक्त पदांचा फटका, निवडणुकीपुरते अधिकारी देण्याचे विभागीय आयुक्तांकडून आश्वासन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर महसूल प्रशासनामध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाची पदे रिक्त राहणे नवीन नाही. मात्र, यंदा त्याचा फटका जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या कामाला बसणार आहे. निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात अडचणी येणार आहेत. तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना सादर केला आहे. यावर लवकरच निवडणूक कालावधीसाठी एक अधिकारी देण्याचे आश्वासन विभागीय आयुक्तांनी दिले आहे. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्व-जिल्हा, एकाच पदावर तीन वर्षे पूर्ण झालेल्यांच्या बदल्या झाल्या. पण येथील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची बदली यापैकी एकही कारण नसताना झाली आहे. उपविभागीय अधिकारी संजीव जाधव, रवींद्र ख्याडे, शंकर बर्गे यांची दोन महिन्यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली होती. लगेच बदली करण्यात आली. 

जिल्हा पुरवठा अधिकारी, राेहयो उपजिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी यांची पदे रिक्त आहेत. आचारसंहितेमुळे आता नवीन अधिकारी मिळण्याची शक्यता नाही. पुरवठा रोहयो कार्यालयाचे पद वर्षभरापासून रिक्त आहे. १० महिन्यांपासून रिक्त पुनर्वसन विभागास पूर्णवेळ अधिकारी मिळाला असला. तरी ते पूर्णवेळ कामकाज सांभाळणार का? हा प्रश्न आहे. 

उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल दोन वर्षांपासून विनापरवाना रजेवर आहेत. यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दोन भूसंपादन कार्यालयाचा अतिरिक्त पदभार आहे. भूसंपादन कार्यालयास श्रावण क्षीरसागर हे एकमेव अधिकारी असून त्यांच्याकडेही भूसंपादन क्रमांक चा पदभार आहे. 

विभागीय आयुक्तांना दिला अहवाल 
जिल्हापरिषद निवडणुकीसाठी ११ निवडणूक अधिकारी गरजेचे आहेत. १० उपलब्ध आहेत, एक कमी पडणार आहे. विभागीय आयुक्तांकडे मागणी केली आहे. विभागीय आयुक्तांनी एक अधिकारी निवडणूक कालावधीसाठी देण्याचे मान्य केले आहे. यामुळे दोन दिवसांत अधिकारी मिळेल.” रणजितकुमार, जिल्हाधिकारी