आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारपर्यंत सुविधांची सर्व कामे पूर्ण होणार, जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- चंद्रभागा नदीलगत ६५ एकरांवरील भाविकांच्या सोयीसुविधांची कामे २० जुलैपर्यंत पूर्ण होतील. या कामांच्या दर्जाबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. कामे पूर्ण झाल्यावर यात्रा काळात भाविकांना रात्री भजन, कीर्तन आणि प्रवचन करण्यासाठी लॉनचीही व्यवस्था केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी पंढरपूर येथे दिली.
जिल्हाधिकारी मुंढे यांनी गुरुवारी कामांची पाहणी केली. त्यावेळी सोबतच्या अधिकाऱ्यांची दमछाक झाली. यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हा पोलिसप्रमुख वीरेश प्रभू, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे, निवासी जिल्हाधिकारी देशमुख प्रांताधिकारी संजय तेली, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश जाधव, तहसीलदार गजानन गुरव, पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, शहर पोलिस ठाण्याचे किशोर नावंदे, तालुक्याचे दयानंद गावडे आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या ठिकाणी कोणतीही अतिक्रमणे दिसता कामा नये. वाळवंटात आणि पंढरपूर शहरात विविध ठिकाणी डिजिटल फलक लावून प्रमुख चौक स्थळांची माहिती भाविकांना द्यावी. चंद्रभागा नदीच्या जुन्या दगडी पुलाजवळ बंधाऱ्यातील घाण तातडीने साफ करून घ्यावी. कुचराई केल्यास अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करू, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी मुंढे यांनी दिली.
गरज पडल्यास समिती रथोत्सवही काढणार
दरवर्षी आषाढी एकादशीला रथयात्रा खासगीवाले सुमारे दोन-अडीचशे वर्षांपासून काढतात. त्यांची सर्वोच्च न्यायालयाने पाद्यपूजा बंद केली. त्यामुळे खासगीवाले यांनी यंदा रथयात्रा काढण्याचा इशारा दिला होता. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, मंदिराबाहेर रथयात्रा काढण्यास त्यांना कोणतीच अडचण नाही. पूजा बंद केल्याने ते रथयात्रा काढत नसतील तर गरज पडल्यास मंदिर समितीच्या वतीने एकादशी दिवशी रथयात्रेचे आयोजन केले जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वेकडून जागेसाठी सकारात्मक प्रतिसाद
चंद्रभागेच्या पैलातीराजवळ ६५ एकर जागा आहे. तिथे भाविकांच्या निवासाची व्यवस्था प्रशासनामार्फत केली जात आहे. या जागेजवळच रेल्वेची ३२ बत्तीस एकर जागा आहे. तीही पालिकेस घेण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यासंदर्भात संबंधित विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात ही जागा पालिकेच्या ताब्यात येईल, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
मंदिर कायद्यानुसारच पूजेचा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने विठ्ठल मंदिर कायदा १९७३ बाबत दिलेल्या निर्णयानुसार मंदिर समितीशिवाय इतर कोणाचेही हक्क नाहीत. इतर हक्कांत खासगीवाले येतात. त्यांनाही यंदा पूजा होणार नसल्याचे कळवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी दिवशी मंदिर समितीची नित्यपूजा होईल. भाविकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आणि मंदिरे कायद्यानुसारच हा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...