Home »Maharashtra »Western Maharashtra »Solapur» Factories Strongly Opposed Workers PF

कामगारांच्या 'पीएफ'ला कारखानदारांचा ठाम विरोध; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

प्रतिनिधी | Oct 12, 2017, 10:32 AM IST

  • कामगारांच्या 'पीएफ'ला कारखानदारांचा ठाम विरोध; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
सोलापूर- यंत्रमाग कारखानदारांना पीएफ देणे बंधनकारक केल्याच्या विरोधात यंत्रमाग कारखानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. मोर्चामध्ये सहभागी कारखानदारांनी कामगारांना पीएफ देणे अशक्य असल्याचे सांगत शासनाने कामगारांच्या हितासाठी कामगार कल्याण मंडळ स्थापन करावे, असा सल्ला देत बोनस देण्याची तयारी कारखानदारांनी दर्शविली. यंत्रमाग कारखानदारांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये पीएफ देणे शक्य नसल्याचे सविस्तर विवेचनही केले होते.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी पीएफ कार्यालयाचे आयुक्त हे बळजबरीने कारखानदारांना पीएफ कायदा लागू करण्याचा प्रयत्न करीत आहे. देशभरात कोठेच यंत्रमाग कामगारांना पीएफ दिले जात नाही. कामगारांच्या हितासाठी शासनाने कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याचा सल्ला दिला. यंत्रमाग कारखानदार कामगारांच्या विरोधात नसून कारखानदारांची आर्थिक स्थिती पाहता पीएफ देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. कारखानदार सत्यराम म्याकल यांनीही कारखानदार कामगारांच्या विरोधात नाहीत, पण यंत्रमाग उद्योगाची आज स्थिती नाही. उलट कामगारांना सुविधा देण्यासाठी यंत्रमाग कारखानदार गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत असल्याचे स्पष्ट केले. यानंतर नगरसेवक देवेंद्र कोठे यांनीही मनोगत व्यक्त केले.

अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील यंत्रमाग कार्यालयापासून मोर्चास सुरुवात झाली. आंदोलनामध्ये कारखानदारांच्या हातामध्ये उद्योग टिकवा, सोलापूर वाचवा, यंत्रमाग कामगारांना नॅशनल पेन्शन योजना लागू करावी, कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे आदी मागण्यांचे फलक होते. विशेष म्हणजे पहिल्यांदाच कारखानदारांचे सर्व कुटुंबच आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले. यंत्रमाग कारखानदार संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, अंबादास बिंगी, नगरसेवक देवेंद्र कोठे, मल्लिकार्जुन कमटम, बसवराज बंडा, सत्यराम म्याकल, नरसय्या वडनाल, जगदीश खंडेलवाल, मुरलीधर आरकाल, राजमहेंद्र कमटम, काशिनाथ गड्डम, नारायण आडकी, लक्ष्मीनारायण कमटम, बालाजी सामलेटी, निलेश फोफलिया, सत्यनारायण गुर्रम, दत्तात्रय म्हंता यांचा सहभाग होता.

कारखानदार, कामगार आमनेसामने...
जिल्हाधिकारीकार्यालयासमोरील अांदाेलनस्थळी यंत्रमाग कामगार कारखानदार आमनेसामने आले. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त लावला. कामगारांनी कारखानदार विरोधी घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करीत कामगारांना शांत केले. मनसे कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू होते. यावेळी यंत्रमागधारक कारखानदार पोहचताच कामगारांनी घोषणाबाजी केली.

Next Article

Recommended