सोलापूर - शेतकरी संघटनेेचे ज्येष्ठ नेते व आपटे सुवर्णपेढीचे मालक वसंतराव गणेशराव आपटे (८१) यांची प्राणज्याेत गुरुवारी सकाळी ११ वाजता मालवली. पाच वर्षांपासून ते आजारी हाेते. गेल्या आठवड्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू हाेते. दरम्यान, सायंकाळी सहा वाजता त्यांच्या पार्थिवावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात विनित, नितीन व महेश ही मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
आपटे यांनी महाविद्यालयीन जीवनापासून भाई एस.एम. पाटील यांच्या जनता दल चळवळीशी जोडले गेले. १९८१ साली शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत कामास सुरुवात केली. सन २००० साली अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदाेलनातही त्यांनी काम केले. १९७८ ते ८३ दरम्यान सिद्धेश्वर कारखान्याचे उपाध्यक्षपद तर आठ वर्षे संचालकपद त्यांनी सांभाळले.
जिल्हा दूध संघाचे संचालक म्हणून काम केले. संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी जिल्हाभर रान उठविले. ऊस दरांचे प्रश्न, दुधाचे दर, कांद्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी आंदोलने केली. शरद जोशी यांच्या मुशीत तयार झालेल्या वसंतरावांनी शेतकरी संघटनेत रघुनाथ पाटील, खासदार राजू शेट्टी यांच्या खांद्यास खांदा लावून काम केले. आपटे यांनी अंत्रोळी येथे शेतकऱ्यांसाठी सहकारी तत्त्वावर दक्षिण तालुका दूध उत्पादक संघाची स्थापना केली हाेती.