आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नापिकी, बँकेच्या कर्जाला कंटाळून झरेगावातील शेतकऱ्याची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गौडगाव - नापिकी आणि कर्जाला कंटाळून झरेगाव (ता. बार्शी) येथील लक्ष्मण भाऊराव लंगोटे (वय ६५) या शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना उघडकीला आली. या घटनेची वैराग (ता. बार्शी) पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
शेतीच्या कामासाठी लक्ष्मण लंगोटे यांनी उपळे शाखेतून ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे दोन लाख रुपये कर्ज घेतले होते. यंदा शेतातील सोयाबीन आणि रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक वाया गेले. अशा स्थितीत कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत ते होते. बँक कर्मचाऱ्यांच्या तगाद्यामुळे आणि समाजातील आपली पत जात असल्याच्या भावनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांचे पुत्र विकास लंगोटे यांनी दिली. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

झरेगाव परिसरात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. शेतीसाठी लंगोटे यांनी बँकेचे, सावकराचे कर्ज काढले होते. बँकेच्या वतीने लेखी नोटीस दिली जात नाही, परंतु दररोज घरी वसुलीसाठी अधिकारी कर्ज भरण्याकरता तगादा लावतात, अशी माहिती मृताच्या मुलाने दिली. लंगोटे यांची बोरगाव (ता. बार्शी) येथे कोरडवाहू १० एकर जमीन आहे.

रविवारी सकाळी लक्ष्मण लंगोटे दोन मुले आणि सुना यांच्यासह शेतात गेले. तेथे थोडावेळ काम करून, मी गावाकडे जाऊन येतो असे सांगून घरी आले, ते परत शेताकडे आलेच नाहीत. त्याच दिवशी सायंकाळी वाजता मुलगा विकास घरी आल्यानंतर घराच्या वाशाला नायलॉन दोरीने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली. गौडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.