आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थंडीने घेतला शेतकऱ्याचा बळी; अंधारात पिकांना पाणी देताना हार्ट अटॅक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामलवाडी - शेतीला पाणी देताना एका ६८ वर्षीय शेतकऱ्याचा बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिकांना पाणी देताना रात्रीच्या थंडीमुळे शेतकऱ्याला हृदयविकाराचा धक्का आला असल्याचा शवविच्छेदन अहवाल डॉक्टरांनी पोलिसांना दिला आहे.त्यामुळे ही घटना तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथे शनिवारी (दि.२५) पहाटे घडली. सांगवी येथील शेतकरी रंगनाथ एकनाथ भुईरकर (६८) शुक्रवारी रात्री शेतात रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता हृदयविकाराच्या धक्याने त्यांचा मृत्यू झाला. 

 

शेतकरी रंगनाथ भुईरकर यांना सात एकर जमीन असून ते पिकासाठी पाणी देण्यासाठी रात्रीची लाईट असल्याने शेतामध्ये गेले होते. शनिवारी (दि.२५) सकाळी ते घराकडे परत आले नसल्याने त्यांचा मुलगा भीमा भुईरकर सकाळी सात वाजता शेताकडे गेला असता रंगनाथ भुईरकर हे त्यांना मृतावस्थेत दिसून आले. तालुक्यात थंडीची लाट आली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. शेतीसाठी महावितरणकडून तामलवाडी, माळुंब्रा, काटी परिसरात रात्रीचा विद्युत पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे शेतात दिवसभर राबल्यानंतर बळीराजाला रात्रभर थंडीत कुडकुडत पिकांना पाणी द्यावे लागत आहे. रब्बी हंगामात चांगले उत्पन्न मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची शेतात गंुतवणूक केली आहे. मात्र, कडाक्याच्या थंडीमुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या दरम्यान काम करताना जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली. 

 

दिवसा वीज द्या 
महावितरण कंपनीने शेतीसाठी रात्री लाइट देता दिवसा लाइट द्यावी. त्यामुळे शेतकऱ्यांना थंडीचा त्रास होणार नाही. कडाक्याच्या थंडीमुळे माझ्या वडिलांचा जीव गेला आहे. 
- भीमा भुईरकर, मृत शेतकऱ्याचा मुलगा 

 

थंडीमुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी 
शेतकऱ्याचा मृत्यू पहाटेच्या वेळी झाला असून त्यांच्या मेंदूला थंडीमुळे रक्त पुरवठा कमी झाल्याने त्यांना हृदय विकाराचा धक्का आला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. 
- डॉ.स्मिता लोंढे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सावरगाव 

 

बदल करता येत नाही 
कृषीपंपांना विद्युत पुरवठ्याचे वेळापत्रक वरिष्ठ स्तरावरून देण्यात येते. त्यानुसार आम्ही लाइट देत असतो. त्या वेळेमध्ये आम्हाला बदल करता येत नाही. 
- पी. एन. कावरे, अभियंता, वीज उपकेंद्र, माळुंब्रा. 

बातम्या आणखी आहेत...