आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँक, बाजार समिती अन् दूध संघावर शेतकरीच सभासद असावा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा बँकेत जो कर्ज घेतो, बाजार समितीत शेतमाल विकतो आणि दूध संघाकडे दूध घालतो, अशी शेतकरी मंडळीच त्या संस्थेचे सभासद असले पाहिजेत, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी येथे मांडली.जिल्हा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते वसंतराव अापटे यांचा गौरव साेहळा रविवारी दुपारी झाला. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा अध्यक्षस्थानी होते. पुढे बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, “सोलापूर जिल्हा बँकेत संचालकांनी अधिकारांचा गैरवापर करून कर्जे लाटली.
शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसेच नाहीत. रिकाम्या गोदामांमध्ये साखर असल्याचे दाखवून बँकेची फसवणूक केली. त्याने विविध कार्यकारी सेवा सोसायट्या अडचणीत आल्या. वसंतराव अापटे आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी या बँकेच्या विरोधात आंदोलन केले होते. आता सत्ता आहे, मंत्री देशमुखांनी सामान्य शेतकऱ्यांना सदस्यत्व देऊन त्यांच्या ताब्यात बँक द्यावी.”सहकार वाईट नाही, पण त्यात शिरलेल्या अपप्रवृत्ती वाईट आहेत, असे सांगत श्री. शेट्टी यांनी सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी १०९ कोटी रुपयांची एफआरपी थकवल्याचे निदर्शनास अाणून दिले.
त्यातविजय शुगर, कूर्मदास, आदिनाथ, स्वामी समर्थ, आर्यन, शंकर आदी कारखान्यांचा समावेश असल्याचा उल्लेखही केला. ही आकडेवारी साखर आयुक्तांनी दिली. रकमेची वसुली झाली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापुरात आंदोलन करेल. त्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा सहकारमंत्री देशमुख यांना दिला.

अध्यक्षीय भाषणात श्री. सुराणा यांनी गांधींच्या विश्वस्त भावनेने आपटे यांचे कार्य झाल्याचे गौरवोद्गार काढले. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन आपटे यांचा गौरव करण्यात आला. शोभा पाटील यांनी सौ. तेजस्विनी आपटे यांचा सत्कार केला. गौरव समितीचे अध्यक्ष सिद्रामप्पा अब्दुलपूरकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष शिवानंद दरेकर आणि सचिव महामूद पटेल यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला. दत्ता थोरे यांनी सूत्रसंचालन केले.
शोषित वर्गासाठी... : श्री. आपटे िलहिलेल्या भावना त्यांचे चिरंजीव नितीन आपटे यांनी वाचल्या. त्यात आपटे म्हणाले, “वयाच्या १८ व्या वर्षी जनता दलात काम केलेे. पंचविशीत साने गुरुजींच्या विचारांनी भारावून गेलो. त्याच काळात सुराणा, मधू दंडवते यांच्यासारखी माणसे भेटली. १९८० च्या सुमारास शरद जोशींचे वादळ आले. ‘भीक नको, हवे घामाचे दाम’ या त्यांच्या वाक्याने प्रभावित केले. याच विचारांनी जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोट बांधली. त्यानंतर अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी जनांदोलनातही आेढला गेलो.”

सहकारमंत्री सुभाष देशमुख : शेतकऱ्यांनान्याय देण्यासाठी अापटे अहोरात्र लढले. त्यांना अपेक्षित असे काम करणार. ज्याचा सात-बारा, त्याला बाजार समितीचा मतदार करण्याचे विधेयक आणतो.

पालकमंत्री विजय देशमुख : आपटेयांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली नाही. पण त्यांचे कार्य प्रेरणादायक अाहे. सामान्य शेतकऱ्यांसाठी त्यांनी जो लढा दिला, त्याला तोड नाही.
आमदारसिद्धाराम म्हेत्रे : आजसर्वत्र वाईटच दिसून येते. वर्तमानपत्रे असोत की वाहिन्या, तिथेही वाईटाचेच दर्शन होते. पण एका चांगल्या कार्याची मूर्ती आपटे यांच्या रूपाने उभे राहिली आहे.
माजीआमदार वामनराव चटप : समाजवादीचळवळीत आपटेंची जडण-घडण झाली. पुढे शरद जोशींच्या संघटनेत आले. शेतकऱ्यांना उत्पादनावर अाधारित दर मिळण्यासाठी त्यांचा लढा झाला.

मान्यवरांची उपस्थिती : यासाेहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. माजी आमदार सि. ना. अालुरे, सुधाकर परिचारक, वस्त्रोद्योग महामंडळाचे रविकांत तुपकर, स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर वनकुद्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अॅड. विजय मराठे, अॅड. गोविंद पाटील, बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे, जाफरताज पटेल आदींचा समावेश होता.

छायाचित्र: सत्कार सोहळ्यास येण्यास खासदार राजू शेट्टी यांना उशिर झाला. व्यासपीठावर आल्यानंतर त्यांनी हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर ज्येष्ठ नेते वसंतराव आपटे यांनीही हात जोडून तत्परतेने प्रतिसाद दिला. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, सौ. तेजस्वीनी अापटे, माजी आमदार वामनराव चटप, जाफरताज पटेल, बाळासाहेब शेळके, अरुण देशपांडे, अॅड. गोविंद पाटील आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...