आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नापिकीच्या नैराश्यापोटी माढा तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माढा- नापिकीमुळे नैराश्यापोटी माढा तालुक्यातील सापटणे (भोसे) येथील शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.जालिंदर महादेव सुतार (वय ४९) असे आत्महत्या केलेल्या त्याचे नाव आहे. 

जालिंदर सुतार यांची सापटणे (भोसे) येथे दीड एकर शेती आहे. यात त्यांनी भूईमुग कडवळाची लागवड केली होती. मात्र, पाण्याचा अभाव आणि वाढत्या उन्हाच्या झळा यामुळे ती जळाली. त्यामुळे जालिंदर हे निराश होते. त्यातच त्यांनी घराशेजारील विहिरीजवळील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. माढा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुतार यांच्यामागे आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा पांडुरंग सुतार यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी सहायक फौजदार मारुती लोंढे तपास करत आहेत. शुक्रवारी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाटणेकर यांनी सुतार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. 

एक लाख २० हजारांचे कर्ज, एकही हप्ता भरला नाही 
जालिंदरसुतार यांनी गावातील सोसायटीतून एक लाख २० हजार रुपये कर्ज काढले होते. मात्र, दुष्काळ, नापिकीमुळे त्यांनी या कर्जाचा एकही हप्ता भरला नाही. त्यामुळे त्याचा बोजा वाढून तो दोन लाख रुपयांपर्यंत पोहोचला. त्यामुळेही ते चिंतेत होते. त्यातच गतवर्षी त्यांचा मुलगा विजेच्या खांबावरून पडून मरण पावला. तो महावितरणच्या कंत्राटदाराकडे काम करत होता. त्याचा आर्थिक आधारही तुटला आणि नापिकी यामुळे ते निराश होते, असे कुटुंबीयांनी सांगितले. मोठ्या मुलाचे लग्न झाले आहे. तो गॅरेजमध्ये कामे करतो तर लहान मुलगा शिक्षण घेत आहे. 

पाणी साेडल्याने जळाली 
सीना माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे सुतार यांच्या शेतातील भूईमुग कडवळ जळाले. त्यांच्या आत्महत्येमागे पाणी सोडल्याने झालेले नुकसान हेही कारण असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. 

अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवा 
सीना माढा योजनेचे पाणी नियमानुसार शेवटच्या (टेल) क्षेत्राला मिळाले नाही. संपूर्ण पाणी सुरुवातीच्या (हेड) भागातच वापरले गेले. पाण्याचे नियोजन केल्याने एका शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागली. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा बळीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाटणेकर यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे. सीना माढा उपसा योजनेच्या भरवशावरच सुतार यांनी पिकांची लागवड केली होती, असेही त्यात म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...