आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवारात दुष्काळाची ‘वेळ’, मनात चिंतेची ‘अमावास्या’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - "वर्सालाया टायमाला पोटऱ्यात राहणारी ज्वारी यंदा पिंडऱ्यापत्तोर भी उगवली न्हाय, समद्या रानात बाटूकच हाय, वगळीत अन् गारीत चार-दोन कणसं दिसतेती, आैंदा वाळलेल्या बाटकाच्या खालीच पांडव पूजा मांडली, वर्सातला लई मोठ्ठा सण पण आैंदा दुष्काळाची ‘वेळ’ साधल्याने मनात चिंता ‘अमावास्येची.’ असे असून देखील शेतशिवार चाऊर चाऊर चांगभलं’ अन् ‘दुष्काळा तू जा पुढे’ अशी आरोळी देत बळीराजाने शनिवारी उत्साह अन् जिद्दीने निसर्ग देवतीची पूजा मांडली.
वेळ अमावास्या निमित्ताने शनिवारी शेतशिवार गजबजला. नैवेद्य तयार करण्यासाठी महिलांची पहाटेपासून लगबग सुरू होती. शिवारातील देवी-देवतांना नैवेद्य देऊन शेतामध्ये पांडव पूजा करण्यात आली. ज्वारीची पाचधाटं एकत्रित बांधून त्याखाली पांडव मांडण्यात आले. त्यासमोर मोगा (मातीचे भांडे) ठेवले. पालेभाज्यांची एकत्रित भज्जीची भाजी अन् बाजरीचे कडबू (उंडे), पुरणपोळी यांचा नैवेद्य त्या भांड्यात ठेवण्यात आला. त्यानंतर डोक्यावर घोंगडी पांघरून ‘चाऊर चाऊर चांगभलं...’ अशी आरोळी ठोकण्यात आली. कर्नाटकच्या सीमावर्ती भागात ‘छज्जी रोटी चवळकी कई चेंगभल्ले...’अशी आरोळी असते. त्यानंतर शेतकऱ्यांनी कुटुंबीय, नातेवाइकांसह जेवण केले. डहाळा, बोरं अन् ऊस असा रानमेवा झोडत शिवारात रपेट मारली. सायंकाळी घरी जाताना ज्वारीची धाटं ‘कृषिलक्ष्मी’ म्हणून घरी नेण्यात आली. काही गावांमध्ये ज्वारीची धाटं टोपलीला बांधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
वेळ अमावास्यानिमित्त शनिवारी डोणगाव येथील राचप्पा निवृत्ती गुरव यांच्या शेतात पूजन करण्यात आले.

सणावर दुष्काळाची सावट
यंदाच्यावर्षी दुष्काळाची भीषण स्थिती जिल्ह्यात आहे. शहरालगतच्या दक्षिण उत्तर सोलापूर तालुक्यासह अक्कलकोट, मंगळवेढा तालुक्यातील ज्वारी पाऊस कमी पावसामुळे उंच झाली नाही. जमिनीत आेलावा कमी असल्याने बाटूक झाले. काही गावामध्ये वाळलेले बाटूक काढण्यात येत आहे.

^दुष्काळामुळे ज्वारीचीचांगली उगवण झाली नसल्याने बाटूक आहे. दरवर्षी हुरड्यात असलेल्या ज्वारीमुळे शिवार बहरते. पण, यंदाच्यावर्षी ते चित्र नाही. पण, पुढच्यावर्षी चांगला पाऊस येईल, दुष्काळ हटेल. नातेवाईक, मित्रमंडळींच्या उपस्थितीत वेळ अमावास्या सण साजरा केला.'' गजानन कुमठेकर, शेतकरी,निंबर्गी