आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लोकमंगल’ विरोधात शेतकरी उतरले रस्त्यावर; शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचल्याचे प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सहकारमंत्री  सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल उद्योग समूहातील साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे परस्पर लाखो रुपयांचे कर्ज उचलले आहे. तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांवर ती तक्रार मागे घेण्यासाठी मंत्रिपदाचा दबाव टाकला जात  आहे. कोट्यवधी रुपयांच्या या फसवणुकीची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी व्हावी तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि. ७) शेतकऱ्यांनी  मंद्रूप येथे रास्ता रोको आंदोलन केले.  दरम्यान, एका शेतक ऱ्यांच्या नावाने १५ लाख रुपयांचे परस्पर कर्ज उचलल्याचे प्रकरण रविवारी उघडकीस आले होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे  माजी सभापती अप्पाराव कोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.  कोरे म्हणाले, शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देता लोकमंगलने त्यांच्या नावे कर्ज काढले. पीक कर्जाला  अत्यल्प व्याज आकारले जाते. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेकडून शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेऊन  तो पैसा लोकमंगल समूह वाढवण्यासाठी देशमुख यांनी वापरला.  येळेगाव व कुसूरच्या शेतकऱ्यांचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर त्यांना दमदाटी करत कर्जाला संमती दिल्याचे लिहून घेतले. शेती कर्जमाफी समिती अध्यक्ष असलेले सहकारमंत्री  देशमुख यांच्या उद्योग समूहातील कारखान्याकडून हा प्रकार सुरू आहे. याची चौकशी व्हावी. एक हजार शेतकऱ्यांच्या नावाने लोकमंगलने कर्ज  उचलले आहे.त्या  पैशातून शेतजमीन, जागा घेत ते मोठे होत आहेत. यास जबाबदार बँक अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी. लोकमंगल व सहकारमंत्री देशमुख यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल दाखल न झाल्यास आंदोलन तीव्र करू, असा इशाराही त्यांनी दिला.  

शेतकऱ्यांच्या नावाखाली बँकांवर दरोडा
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. बसवराज बगले म्हणाले, भंडारकवठे व बीबीदारफळच्या लोकमंगल साखर कारखान्याने अनेक शेतकऱ्यांच्या नावे परस्पर लाखो रुपयांचे कर्ज उचलले.  ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. लोकमंगलने एक प्रकारे शेतकऱ्यांच्या नावाने बँकांवर दरोडा टाकला आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन करू. 
बातम्या आणखी आहेत...