आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक कर्जमाफी नव्हे, ऐतिहासिक फसवणूक; शेतकरी क्रांती मोर्चात नेत्‍यांचा शासनावर हल्‍ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- छत्रपती शिवरायांच्या नावाने दिलेल्या कर्जमाफीला ‘ऐतिहासिक योजना’ म्हणून संबोधले जात आहे. वस्तुत: त्यातील अटी अाणि शर्ती पाहिल्या तर शेतकऱ्यांची ऐतिहासिक फसवणूक झालेली दिसून येते. ही कर्जमाफी नाही, कर्जवसुली आहे. ही लबाडी आहे, अशा तीव्र शब्दांत शेतकरी नेत्यांनी शुक्रवारी राज्य शासनाला झोडले. 
 
शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने शुक्रवारी दुपारी किसान क्रांती मोर्चा काढला. चार हुतात्मा पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून दुपारी साडेबाराला त्यास सुरुवात झाली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकला. तिथे त्याचे सभेत रूपांतर झाले. शेतकरी नेते रघुननाथदादा पाटील, माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य डॉ. अशोक ढवळे, नरसय्या आडम, डॉ. अजित नवले, किशोर ढमाले, संजय पाटील- घाटणेकर, सिद्धप्पा कलशेट्टी, अॅड. सविता शिंदे, सुशीला मोराळे आदींची या वेळी भाषणे झाली. कर्जमाफीतील पैलू उलगडताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. 
 
ही चक्क शेतकऱ्यांची फसवणूकच 
दीड लाखांच्या मर्यादेतील कर्जे माफ करण्याचे जाहीर झाले आहे. परंतु त्यातील अटी पाहिल्यास केवळ १० टक्के लोकांना त्याचा लाभ मिळेल. तेही मागील कर्ज भरल्यानंतर. म्हणजेच ही कर्जमाफी नाही, तर कर्जवसुली अाहे. यात सरकारची कुठलीच सहानुभूती नाही. नुसती लबाडी आहे. शेतकऱ्यांची केलेली क्रूर चेष्टा अाहे.' 
- डॉ. अजित नवले, सुकाणू समितीचे राज्य सदस्य 
 
कर्ज हे सरकारचे पाप 
राज्यभरातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर वाढणारे कर्ज हे सरकारचेच पाप आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला हमीभाव नाही, योग्य पतपुरवठा नाही, त्यामुळे लागवडीचा खर्चही बळीराजाच्या हाती मिळत नाही. परिणामी कर्जबाजारी आणि आत्महत्या. या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याचे धोरणच नाही. त्यामुळे शेतकरी कर्जाला सरकारच जबाबदार अाहे. - रघुनाथदादा पाटील, राज्य सुकाणू समिती निमंत्रक 
 
भांडवलदार अदानी, अंबानींना माफी 
सामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभर रान उठवावे लागले. दुसरीकडे अदानी, अंबानी यांच्यासारख्या भांडवलदारांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बिनबोभाट माफ झाले. त्यामुळे हे सरकार सामान्यांचे नाही. भांडवलदारांचे आहे. महाराष्ट्रात ७५ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी अात्महत्या केल्या, त्याचे गांभीर्य या सरकारला नाही.'' 
- डॉ. अशोक ढवळे, माकप केंद्रीय समितीचे सदस्य 
 
कर्जमाफी, मोफत वीज 
सुकाणू समितीने काही प्रमुख मागण्या मांडल्या. त्यात संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींचा अंमल आणि कायमस्वरूपी मोफत वीजपुरवठा यांचा समावेश आहे. या मोर्चात जिल्हाभरातून शेतकरी सहभागी झाले होते. त्यांच्या हाती ‘संपूर्ण कर्जमाफी द्या’ असे फलक होते. तसेच घोषणाबाजीही करण्यात येत होती. 
 
बातम्या आणखी आहेत...