आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहान लागली तरच विहीर खोदण्याने शहर अडचणीत, मनपा तिजोरीत खडखडाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘तहान लागली की विहीर खोदायची’असे धोरण महापालिका प्रशासनाचे आहे. या धरसोड वृत्तीमुळे महापालिका कर्मचाऱ्यांसह शहर अडचणीत येत आहे. वेळीच वसुली होत नसल्याने विविध कर रूपाने सुमारे साठ कोटी रुपये थकलेले आहेत. 
 
आता महापालिकेच्या तिजोरीत खडखडाटच आहे. विकासकामांवर खर्च लांबच, कर्मचाऱ्यांचे वेतन देणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता मार्चमध्ये प्रशासनाने कर वसुली मोहीम सुरू करणार आहे. अगदी जप्तीचीही कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त विजयकुमार काळम यांनी सांगितले.
 
कर वसुलीसाठी महापालिकेचा स्वतंत्र विभाग आणि यंत्रणा कार्यरत असते. तरीही करवसुली वेळेवर होत नाही. मिळकत कर सुमारे ३८ कोटी, एलबीटी आठ कोटीपेक्षा जास्त भूमी मालमत्ता आदी विभागांचे मिळून सुमारे साठ कोटी रुपये थकले आहेत. विशेष कर वसुली मोहीम प्रशासन राबवणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्तांनी दोन बैठका घेतल्या. थकबाकीदारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.
 
मक्तेदारांचे सुमारे १०० कोटी रुपये देणी आहे. याशिवाय इतर देणी आहेत. एलबीटीसह अनेक उत्पन्न बंद पडल्याने त्यामुळे अडचण येत आहे. मनपा स्तरावर वसुली सुरू करा. त्यासाठी महापालिका आयुक्तांना जबाबदार धरण्याचे आदेश शासनाने काढले. त्यामुळे आयुक्त काळम यांनी मिळतकर वसुलीची बैठक घेतली. 

यासाठी विभाग प्रमुखांना जबाबदार धरण्यात आले. लाखांच्या पुढील थकबाकीदारांची यादी जाहीर करून कारवाई करण्यात येईल. मार्च महिन्यात वसुली करण्यावर भर असेल, असे आयुक्त काळम म्हणाले.

अंदाजपत्रक सादर
महापालिका प्रशासनाने २० फेब्रुवारीच्या आत स्थायी समितीकडे बजेट सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार निवडणूक काळात स्थायीकडे बजेट सादर करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त काळम यांनी दिली. यंदाचे बजेट वस्तुस्थितीनुसार आहे. उत्पन्नाचे साधन कमी झाल्याने त्याबाबत काही उपाय सुचवण्यात आले आहेत.

मार्चअखेर शहर हागणदारीमुक्त
मार्च महिनाअखेर शहर हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. केंद्र व राज्य शासनाने त्यासाठी निधी दिला आहे. महापालिका हिस्सा म्हणून २.४० कोटी रुपये १४ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून महापालिका वापरणार आहे. त्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.

‘एलबीटी’ वसुली नाही
व्यापाऱ्यांकडून स्थानिक संस्था कराची (एलबीटी) थकित रक्कम वसुली पूर्ण थांबली आहे. राज्य सरकारने विशेष सवलत देत अभय योजना जाहीर केली होती. तिची मुदत संपल्यानंतर अनेकांनी थकित एलबीटी भरलेली नाही. महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
बातम्या आणखी आहेत...