आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजाबरोबर आर्थिक दुर्बलांनासुद्धा आरक्षण मिळावे; रामदास आठवले यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- दलितांच्या आरक्षणाला धक्का लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. मराठा समाजाबरोबरच इतर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा. यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करून सध्याच्या आरक्षणाच्या असलेल्या टक्केवारीच्या मर्यादेत वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी सर्वात प्रथम आपण मागणी केल्याचे सांगितले. 

शुक्रवारी पद्मावती उद्यानाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि स्मारक लोर्कापण सोहळा आठवलेंच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते. 

आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेविरुद्ध लढा दिला. देशात सामाजिक ऐक्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. समाजातील तळागाळातील लोकांची उन्नती झाली तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल म्हणून त्यांना आरक्षण मिळावे, हे त्यांनी हेरले होते. संविधानाने समाजातील तळागाळातील दलितांना त्यांनी आरक्षणाचा हक्क दिला. त्या आरक्षणाच्या हक्कामुळेच दलित समाज प्रगती करीत विकासाच्या वाटेवर दिसत आहे.
 
समाजाला जोडण्याची भूमिका डॉ. आंबेडकरांनी मांडली. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदीही डॉ. बाबासाहेबांच्याच विचाराचा धागा पकडून भारत जोडो अभियान राबवत आहेत. ते दलित विरोधी नाहीत. मात्र काँग्रेसकडून उगाचाच मोदी, भाजप तसेच संघ दलित विरोधी असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र कुणीही याकडे लक्ष देऊ नये. इंदू मिलच्या जागेवर भव्य असे आंबेडकरांचे स्मारक साकारले जाणार असून, जगात सर्वात उंच असा पुतळा या ठिकाणी बसवला जाणार आहे, असे आठवले म्हणाले. 

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आठ एकर जागेवर भव्य शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी आपला प्रयत्न आहे. मंगळवेढा येथे श्री संत चोखामेळांच्या स्मारकासाठी विशेष निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास आमदार भारत भालके, आमदार दत्तात्रय सावंत, माजी सुधाकर परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, रिपाइंचे नेते राजा सरवदे, सुनील सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, बाळासाहेब कसबे, संजय सावंत, दीपक चंदनशिवे, कीर्तिपाल सर्वगोड, उपनगराध्यक्षा सुजाता बडवे, उज्ज्वला भालेराव, नगरसेवक महादेव भालेराव, अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील, नगर अभियंता दिनेश शास्त्री तसेच सर्व समित्यांचे सभापती, नगरसेवक आदी होते. 

हवेचा अंदाज मला अगोदरच येतो 
केंद्रीयमंत्री रामदास आठवले म्हणाले, हवा कुठल्या दिशेने जाते याची अगोदरच आपणाला कल्पना येते. त्यामुळे आपण भारतीय जनता पक्षाच्या बरोबर असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा २०१९ मध्ये तर सत्तेवर येणारच आहे. पण २०१४ मध्येदेखील हाच पक्ष पुन्हा केंद्रात सत्तेवर असेल असादेखील विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. केंद्रातील भारतीय जनता पक्ष हा देशहिताची धोरणे राबवत असल्याचे त्यांनी या वेळी ठासून सांगितले. त्याची उदाहरणेही दिली. 
बातम्या आणखी आहेत...