आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या स्वातंत्र्य दिनी सोलापुरात झाला होता असा जल्लोष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- १९४७ मध्ये १५ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजून मिनिटांनी स्वातंत्र्याच्या जल्लोषाला सुरुवात झाली. गिरणीचे भोंगे, आगगाड्यांच्या शिट्ट्या वाजल्या. प्रथम काँग्रेसच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. 

शहर काँग्रेस, तालुका काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर नगरपालिकेच्या इमारतीवर देशभक्त मार्शल रामकृष्ण जाजू, तुळशीदास जाधव, डॉ. कृ. भि.अंत्रोळीकर, शेठ लोणकरण चंडक यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. टिळक चौक येथे राष्ट्रसेवा दलाच्या वतीने शहर काँग्रेसचे अध्यक्ष केशवलाल शहा यांच्या ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी गिरण्या, बाजारपेठा, मंदिरे, मशिदी, सार्वजनिक संस्थांना आकर्षक नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली. दुपारी हाेम मैदान येथून मिरवणूक निघाली. तीत मोटार, टांगे, सायकल, बैलगाड्या, उंट आणण्यात आले. नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मिरवणुकीच्या अग्रभागी दोन उंटावर राष्ट्रध्वजधारी होते. मागे मोटारीवर हिंद मातेच्या भव्यचित्राजवळ हुतात्मा धनशेट्टी यांचे चिरंजीव शंकरप्पा धनशेट्टी हे तलवार घेऊन उभे होते. नंतर मिरवणूक मजूर मैदान (पार्क मैदान) येथे आली. या वेळी मजूर मैदानावर सैनिक, पोलिस, स्काऊट यांनी संयुक्तपणे सलामी दिली. ही मिरवणूक दोन तास चालली. माणिक चौक, हाजीमाई चौकमार्गे सुभाष चौक येथे पोहोचल्यानंतर सुभाष चौकात मिरवणुकीची सांगता झाली. जिल्हा काँग्रेस कमिटीने दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यानुसार प्रभात फेरी काढली. रात्री सात वाजता मजूर मैदानावर जाहीर सभा झाली. नगरपालिकेने २५ हजार रुपये स्वातंत्र्य दिनासाठी खर्च करण्याचे ठरवले होते. अशा रीतीने आनंदोत्सव साजरा साजरा झाला. 

जुनी गिरणी (सोलापूर स्पिनिंग व्हिविंग मिल)च्या प्रवेशद्वारावर मोठी घंटा बांधण्यात आली. सोलापूरकरांनी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करावा, सोलापूरकर जागे राहावे, या हेतूने ही घंटा रात्रभर वाजवण्यात आली होती. सकाळी साडेआठ वाजता कलेक्टर कचेरीच्या आवारात कलेक्टर मिस्टर घाटगे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी छन्नुसिंग चंदेले, श्री. जाधव, डॉ. अंत्रोळीकर आदींची उपस्थिती होती. या वेळी कलेक्टर घाटगे यांनी केलेले भाषण अतिशय प्रेरणादायक होते. ते म्हणाले, आता सरकार अाणि जनता एक झाले असून, अज्ञान आणि द्रारिद्र्य दूर करण्याकरिता तरुणांनी पुढे आले पाहिजे. सरकारी नोकरांनी लाचलुचपतपासून दूर राहण्याचे आदेश त्यांनी त्यावेळी दिला. तसेच ध्वजाचा मान, सन्मान राखण्यासाठी प्रत्येकाने प्राणपणाने लढले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 
बातम्या आणखी आहेत...