आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यमाच्या रेड्याने बजावले, माझ्यासोबत येण्याची करू नका चूक !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मंगळवारी दिवे लागणीची वेळ. सात रस्ता परिसरातील शासकीय विश्रामगृहाशेजारी साक्षात यमराज अवतरला. सोबत आपले वाहन रेड्याला आणायलाही तो विसरला नाही. वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांना पकडून रेड्यावर आपल्या पाठीमागे बसवून नेतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याची यमाची योजना होती. पण रेडा दयाळू निघाला. त्याने सोलापूरकरांना सुधारण्याची संधी दिली. आपल्या पाठीवर बसवून घेण्यास त्याने चक्क नकार दिला. उड्या मारू लागला. जणू यातून तो सोलापूरकरांना बजावत होता, "माझ्यासोबत येण्याची नका करू चूक!' यमराजाने रेड्याचे संकेत ओळखले आणि रेड्याला बाजूला बांधले. स्वत:च रस्त्यावर उतरून प्रबोधन करू लागला. हे चित्र होते रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्तच्या अभिनव अशा प्रबोधन उपक्रमाचे.

वाहतुकीच्या नियमांबाबत जागृतीसाठी आरटीओ कार्यालयानेे बहुरूपी पथकाची मदत घेतली. सायंकाळी सात रस्ता येथे शासकीय विश्रामगृहासमोरून जाणाऱ्या वाहनांना बहुरूपी पथकातील "यम' पाळा नियम असे सांगत होता. आपले सांगणे प्रभावी व्हावे यासाठी या यमाने डोक्यावर भले मोठे शिंग, हातात गदा आणि डोळ्यांवर गॉगल घातला होता.

जिल्हाधिकाऱ्यांचा सारथी
आला यमाच्या कचाट्यात

सीटबेल्ट लावा अन्यथा माझ्याशी भेट, असे यम प्रत्येकाला बजावत होता. यमाला पाहून काही जण कुतूहल म्हणून थांबले. आरटीओने या वेळी ध्वनिक्षेपकावरून वाहन चालकांना विविध सूचना करत पत्रकेही वाटली. जिल्हाधिकारी मुंढे यांच्या सारथ्यालाही यमाने सीट बेल्टची सूचना केली.