(फाइल फोटो.)
उस्मानाबाद- शासनाने नव्याने पारित केलेल्या कायद्यानुसार वैधानिक इशारा पाकिटांवर छापल्याच्या कारणावरून उस्मानाबाद, उमरगा येथून नऊ लाख ३७ हजार ६६८ रुपयांच्या सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. अन्न औषध प्रशासनाने केलेल्या या कारवाईमध्ये ११ हजार ४०० पाकिटांवर निर्देशांनुसार वैधानिक इशारा छापला नसल्याच्या प्रकार समोर आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील सिगारेट विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
सध्या सर्वत्र तंबाखूयुक्त सिगारेट ओढण्याचे प्रमाण वाढत आहे. किशोरवयीन व्यक्तींपासून ज्येष्ठांपर्यंत बहुतांशजण सिगारेटच्या धुंदीत असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे कर्करोग अन्य प्रकारचे जीवघेेणे रोग जडलेल्या रुग्णांच्या संख्येचा आलेख वरवर जात आहे. तसेच सिगारेट ओढणाऱ्यांच्या सहवासातील व्यक्तींना केवळ धुरामुळे रोगांची लागण होत आहे. सिगारेटच्या धुरामुळे बाधित झालेल्यांची संख्या मोठी आहे. शासन सामाजिक संस्थांकडून सिगारेटची नशा करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, याचा म्हणावा तसा उपयोग झालेला नाही. सिगारेटच्या अंमलाखाली असणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे केंद्र शासनाने पाकिटांवर वैधानिक इशारा छापण्याबाबत कडक निर्देश दिले आहेत.
शासनाच्या निर्देशांनुसार वैधानिक इशारा लिहिण्याबाबत अनेक कंपन्या टाळाटाळ करत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे अन्न औषध प्रशासनाने उस्मानाबाद उमरगा येथे छापे मारले आहेत. यामध्ये उस्मानाबाद येथील पोस्ट कॉलनीनजीकच्या उत्कर्ष एजन्सीजमध्ये अचानक पाहणी करण्यात आली, तेव्हा तेथे लाख १४ हजर रुपयांचे नऊ हजार ४०० सिगारेटची पाकिटे आढळली. तसेच उमरगा येथील एकोंडी रस्त्यावरील अशोक एजन्सी येथेही छापा मारण्यात आला. यावेळी २३ हजार ६६८ रुपयांच्या सिगारेटची दोन हजार पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. कारवाई अन्न आणि औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त तुळजादास बोराळकर (अन्न), संजय काळे (औषध), अन्नसुरक्षा अधिकारी आर. एन. महाजन, डी. व्ही. पाटील, औषधी निरीक्षक सुनील गवळी, नाना गाढवे, नमुना संकलक एस. टी. आकोसकर आदींनी केली.
नामांकितब्रॅण्ड अडकले : याकारवाईत बड्या कंपन्यांचे ब्रॅण्ड अडकले आहेत. जिल्ह्यातील अशा आठ ब्रॅण्डचा समावेश आहे.नामांकित कंपन्यांची उत्पादने या कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे कारवाईला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
व्याप्ती वाढणार
केंद्रशासनाच्या निर्देशानुसार वैधानिक इशारा पाकिटावर छापल्यामुळे ही कारवाई झाली आहे. अशा सिगारेट बाजारात आढळल्यास विक्रेत्यांचा माल जप्त करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. जप्त केलेल्या मालासंदर्भातील कारवाई वरिष्ठांच्या निर्देशावरून होणार आहे. -तुळजादास बोराळकर, सहाय्यकआयुक्त, (अन्न.)
नवीन संशोधनानुसार सिगारेटच्या पाकिटावरील वेष्टनावर सिगारेट ओढणे अथवा तंबाखू सेवन आरोग्याला कसे घातक आहेत, यासदंर्भात स्पष्टपणे सूचित केलेले असावे. वेष्टनावरील केवळ १५ टक्के जागेमध्ये आपली कंपनी, ब्रँड, उत्पादकता दिनांक, बॅच क्रमांक आदी बाबींचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. पूर्वी या उल्लेखासाठी ६५ टक्के जागा होती. चित्र, घोषवाक्य असण्याबाबतचे निर्देश आहेत.
इशाऱ्याबाबतचे निर्देश
जप्त केलेल्या मालाबाबत विक्रेते मालासंदर्भात पुढे काय कारवाई करावी, यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाला मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. यामध्ये न्यायालयीन खटला चालवणे, जप्त केलेला परत देऊन मोठा दंड करणे, पोलिसात गुन्हा दाखल करणे, जप्त माल परत देणे अशा स्वरुपाची कारवाई होऊ शकते.