आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघ शोधण्यासाठी वन विभागाची मोहीम; वनपाल म्हणाले, घाबरू नका वाघ नव्हे तरस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वालवड - गावकऱ्यांनी पाहिलेला वाघ शोधण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी सोमवारी (दि.४) दिवसभर वणवण भटकत आहेत. भूम तालुक्यातील वाल्हा येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास वाघ आढळल्याचे काही शेतकऱ्यांनी गावकऱ्यांना सांगितल्यानंतर वन विभाग आणि शेतकऱ्यांची सोमवारपासून वाघासाठी शोध मोहीम सुरू झाली आहे. दिवसभर वणवण करून वन विभागाने वाघ नसून, तरस असल्याचा निष्कर्ष काढला. गावकरी अजूनही वाघ आढळल्याचे सांगत असल्याने हे अाव्हान संपलेले नाही. दरम्यान, सोमवारी सायंकाळी वेगवेगळ्या भागातून वाघ आढळल्याच्या अफवा सुरूच होत्या.

 

रविवारी रात्री च्या सुमारास वाल्हा येथील जालिंदर चव्हाण पिकअप गाडी घेऊन मलकापूरला जात होते. शिवावरील कॅनॉलजवळ रस्त्यावर हॉर्न वाजवण्याचा प्रयत्न केल्यानंतर अचानक प्राण्याने बाजूला झेप घेतली. सदरील प्राणी वाघासारखा दिसत असल्यामुळे त्यांनी गावात येऊन गावकऱ्यांना शिवावर वाघ असल्याचे सांगितले. त्यामुळे वाल्हा गावात वाघ असल्याची बातमी परिसरातील गावातही पसरली. त्यामुळे परिसरातील वस्तीवरील गावातील लोकांत प्रचंड घबराट पसरली. शेतवस्तीवरील काही नागरिकांनी गावात ठाण मांडले तर काहींनी घाबरून घर बंद करून घरातच राहणे पसंत केले. सोमवारी सकाळी वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी येऊन प्रत्यक्षस्थळी भेट देऊन पाहणी केली. सदरील प्राण्याच्या पायाच्या ठशांवरून ते ठसे वाघाचे नसून तरसाचे असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून त्याचा मागोवा घेतला. सदरील ठसे वाघाचे आढळून आलेले नाहीत. वनविभागाच्या वतीने संपूर्ण पाहणी करण्यात येत असून वनविभागाचे पथक गस्त घालत आहे. वनविभाग वाघाला पुष्टी देत नसले तरी प्रत्यक्षदर्शी वाघच असल्याचे सांगत असल्यामुळे नागरिकांत संभ्रम आहे.

 

पायाच्या ठशावरून निष्कर्ष काढला
वाघ आपल्या परिसरात येण्याची शक्यता नाही.पायाचे ठसे तरसाचे आहेत.नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
- अनिल कुलकर्णी, वनपाल, भूम.

 

वाघच असण्याची शक्यता
रात्री गाडी घेऊन जाताना आडवा असलेला प्राणी पाच फूट जवळून पहिला. वाघच असण्याची माझी खात्री आहे. तरसासंबंधी सांगता येणार नाही.
- जालिंदर चव्हाण, प्रत्यक्षदर्शी.

 

साधर्म्य कोणते?
वाघआणि तरस यामध्ये साधर्म्य रात्रीची वेळ असल्यामुळे तरस वाघ असल्याचे भासल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.वाघ आणि तरस दोन्ही प्राणी मांसाहारी असले तरी तरस माणसांवर हल्ला करत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...