आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनवासाला निघालेले वडाळ्याचे चार भाविक ठार, विद्यार्थी, महिलेचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ/ सोलापूर - मोहोळ तालुक्यात सोमवारी विविध ठिकाणी झालेल्या चार अपघातांत सात जणांचा मृत्यू झाला. वडाळा (ता. उत्तर सोलापूर) गावात सुरू असलेल्या रामायण कथेमधील वनवासासाठी निघालेल्या भक्तांवर काळाने झडप घातली. टाळ, मृदंग, वीणा डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन 'श्रीराम जय राम जय जय राम'चा जयघोष करत पायी निघालेल्या श्रीराम भक्तांना भरधाव टेम्पोने मागून चिरडले. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (दि. २१) पहाटे पाचच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील वडवळजवळ हा अपघात झाला. यात दत्तात्रय विठ्ठल शेंडगे (वय ५४), विलास अंबादास साठे (४०), सुभाष उर्फ भाऊ नारायण जाधव (४८) जिजाबाई सुब्राव गाडे (६०, सर्व रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर) यांचा मृत्यू झाला. अन्य अपघातांत मोहोळ शहरात विद्यार्थी, कुरूल येथे पोलिस कॉन्स्टेबल तर चंद्रमौळीजवळ एका महिलेचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले, की वडाळा येथे रामायण कथा सुरू असून, २५ पुरुष सहा महिला रविवारी (दि. २०) दुपारी वडाळा येथून लांबोटीमार्गे मोहोळ तेथून पंढरपूरकडे निघाले होते. रविवारी लांबोटी येथे सर्वांनी मुक्काम करून रात्री भजन, कीर्तन केले. सोमवारी पहाटे सर्वजण टाळ, मृदंगाच्या गजरात मोहोळकडे येत होते. पहाटे पाच वाजता वडवळ येथील सोनाली ट्रॅक्टर शोरूमसमोर पाठीमागून वेगाने येणाऱ्या अज्ञात टेम्पोने दत्तात्रय विठ्ठल शेंडगे (वय ५४), विलास अंबादास साठे (४०), सुभाष उर्फ भाऊ नारायण जाधव (४८) जिजाबाई सुब्राव गाडे (६०, सर्व रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर) यांना जोराची धडक दिली. यात दोघांच्या अंगावरून टेम्पो गेला. जिजाबाई गाडे रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्याने त्यांना जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. जोराचा आवाज आल्याने दिंडीच्या पुढील बाजूस असलेले भाविक सावध झाले. त्यांनी त्वरित १०० क्रमांकावरून पोलिसांशी संपर्क साधला. अपघातानंतर टेम्पो चालकाने पळ काढला. पोलिस निरीक्षक सूरज बंडगर अपघातस्थळी दाखल झाले. मोहोळ ग्रामीण रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले. वडाळा येथे मृतांवर सामुदायिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुढे वाचा.. कारच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू, चंद्रमौळीजवळ कारने महिलेला ठोकरले, पोलिस हवालदाराचा पिंपरीजवळ मृत्यू
बातम्या आणखी आहेत...