आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लोकमंगल’ कारखान्याचा प्रताप, मजुराच्या नावे उचलले 15 लाखांचे परस्पर कर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी- सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे वर्चस्व असलेल्या लोकमंगल साखर कारखान्याने एका  मजुराच्या नावाने १५ लाख  रुपयांचे कर्ज उचलल्याचा तिसरा  प्रकार उघडकीस आला आहे. व्याजासह १९ लाख रुपये भरण्याची देना बँकेची नोटीस तोडणी कामगाराच्या नावे आल्याने  खळबळ उडाली आहे.  

बार्शी तालुक्यातील इंदापूर येथील मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महादेव मस्के यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे.  सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखान्यांनी याआधीही वाहनधारकांच्या नावे तसेच शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यात आता ऊस तोडणी मजुराच्या नावेही परस्पर ऊस तोडणी वाहतूक कर्जाची भर पडली आहे.  महादेव मस्के व त्यांची पत्नी लक्ष्मी हे बीबी दारफळ येथील लोकमंगल कारखान्याकडे कळंब तालुक्यातील धानोरे येथील मिरगणे नामक मुकादमामार्फत ऊसतोडणी कामगार म्हणून कामाला होते. सन २०१५ व २०१६ असे दोन हंगाम त्यांनी काम केले आहे. त्यांच्याकडे एक बैलगाडी देण्यात आली होती. हंगाम संपल्यानंतर ते गावी परतले. सध्या महादेव हे उस्मानाबाद येथे जाऊन मजुरी करतात.  

देना बँकेच्या सोलापूर शाखेने २३ जुलै रोजी महादेव बापू मस्के यांच्या नावे जारी केलेली ही नोटीस शनिवार  मस्के यांना मिळाली. त्यामध्ये  सन २०१५-१६ या वर्षासाठी लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज साखर कारखाना बीबी दारफळ (ता. उ.सोलापूर) मार्फत आमच्या बँकेकडून १५ लाखांचे कर्ज घेतल्याचे म्हटले आहे. कर्ज व व्याज जून २०१६ पूर्वी भरणे अपेक्षित होते. परंतु  कर्जाची परतफेड आपण केलेली नाही. आज रोजी आपणाकडे १९ लाख १४ हजार २५७ व १ एप्रिलपासूनचे व्याज बाकी असल्याचे नोटिसीत नमूद केले आहे. नोटीस मिळताच ऊसतोडणी वाहतूक कर्जाची थकीत बाकी व्याजासह दहा दिवसांत बँकेत भरणा करावी; अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी तंबी देण्यात आली आहे.    

देना बँकेकडून आपण असे कर्जच घेतले नाही तर नोटीस कशी आली, असा प्रश्न पडून भीतीने मस्के कुटुंबीयांचे हातपायच गळाले. त्यांनी “लोकमंगल’च्या चिटबॉयशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी कारखान्यावर येण्यास सांगितले. कारखाना प्रशासनाला मस्के यांना अशी नोटीस गेल्याची कुणकुण लागल्यानंतर त्यांचा कर्मचारी दोन दिवसांपासून मस्के कुटुंबीयांशी संपर्क साधून नोटिसीची प्रत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

आम्ही कर्जच घेतले नाही  
मी व माझ्या पत्नीने ऊसतोडणी कामगार म्हणून दोन हंगाम मुकादमामार्फत लोकमंगल कारखान्यासाठी काम केले आहे. तिथे असताना अथवा नंतर आम्ही असे ऊसतोडणी वाहतूक कर्ज घेतलेले नाही. बँकेची कर्जवसुलीची नोटीस आल्यापासून अन्नपाणी गोड लागेना. मी तर आजारीच पडलो आहे. कारखान्याचा एक माणूस नोटिसीची प्रत मागत आहे.  
- महादेव मस्के, भीमनगर, इंदापूर, ता.बार्शी
बातम्या आणखी आहेत...