आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Front Panel Announced The Development Of Co operation

सत्ताधारी संचालकांतर्फे शेतकरी सहकार विकास आघाडी पॅनल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सत्ताधारी संचालक मंडळाने बैठकीतील चर्चेनंतर गणपतराव देशमुख, विजयसिंह मोहिते-पाटील विद्यमान अध्यक्ष दिलीप माने यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार दिलीप सोपल यांनी शुक्रवारी सायंकाळी शेतकरी सहकार विकास आघाडी पॅनलची घोषणा केली. जिल्हा बँक निवडणुकीनिमित्त प्रथमच सर्व पक्षीय राजकीय विरोधक एकत्र येत ज्येष्ठ संचालकांनी जागा वाटप करण्याचा निर्णय घेतला. ब्रह्मदेव माने बँकेच्या सभागृहात पॅनलची घोषणा जागा वाटपाचा निर्णय घेण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीस ज्येष्ठ संचालक सुधारक परिचारक, आमदार बबनराव शिंदे, दीपक साळुंखे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, राजन पाटील, बबनराव आवताडे, रश्मी बागल उपस्थित होते.
...त्यांचे स्वागत करतो : सोपल
आमदारदिलीप सोपल यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सत्ताधारी विरोधात शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. स्वतंत्र पॅनल तयार होणार आहे ? या प्रश्नावर त्यांनी, निवडणूक लढवावी, त्यांचे स्वागतच आहे, असा टोला लगावला. बँकेच्या आर्थिक स्थितीवर सोपल यांनी बँक हा व्यवसाय आहे, कधी तोट्यात येतो, कधी नफ्यात येतो. ही प्रक्रिया चालतच असल्याचे स्पष्ट केले.
सभागृहात जागा वाटपावर चर्चा होत असताना ज्येष्ठ संचालक सिद्रामप्पा पाटील यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या.

१.तुम्ही बँकेचे उपाध्यक्ष होता. आता अध्यक्षपद घ्याल का, असे विचारल्यानंतर पाटील म्हणाले, बँकेत काय चाललंय तुम्हाला माहीत आहे. सगळे विहिरीच्या काठाला आलेत. आत ढकलून दिलं, काय करणार? त्यापेक्षा बाहेर बसलेलं बरं म्हणताच हशा पिकला.

२.विधान परिषद लढवणार का?, असे विचारल्यानंतर पाटील म्हणाले, त्याला पैसा लागतो, मागच्या वेळी दीपक साळुंखेने प्रत्येकाला ३.५० लाख रुपये वाटले होते. म्हेत्रे सगळ्याचे पैसे घेऊन बसायचे, पण तेव्हा त्यांच्याही लोकांना दिले. काही उपयोग नाही त्या निवडणुकीचा.

अप्पांची टोपी सोपलांवर
बैठकी दरम्यान,आमदार दिलीप सोपल यांनी सिद्रामप्पा पाटील यांची टोपी काढून स्वत:च्या डोक्यावर घातली. ‘अप्पांची टोपी तुम्ही का घातली? असे विचारले असता, यावर सोपल म्हणाले, ‘सासऱ्याने जावयाला काय घंटा दिलयं का? म्हणून घातली.’

"दक्षिण'मधून कोण ?
दक्षिण सोलापूर सोसायटी मतदार संघातून सुरेश हसापुरे संचालक आहेत. मात्र, शुक्रवारच्या बैठकीत ते हजर नव्हते. मागच्या निवडणुकीत हसापुरे अपक्ष निवडून विजयी झाले आणि ते सत्ताधारी गटाचे असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे यावेळी "दक्षिण'मधून हसापुरे यांना संधी मिळणार की शिवदारे यांना? हे ज्येष्ठ नेत्यांवर सोपवण्यात आले आहे. हसापुरे शिवदारे दोघेही अर्ज दाखल करणार असल्याने अर्ज मागे घेईपर्यंत हा निर्णय गुलदस्त्यात राहण्याची शक्यता आहे.

असे झाले जागांचे वाटप
सोसायटी मतदार संघातील ११ जागांचे एका तालुक्यास एक जागा याप्रमाणे वाटप होईल. मात्र उमेदवार कोण? हा निर्णय त्या तालुक्यातील स्थानिक नेते घेणार अाहेत. पणन, साखर कारखाने सूत गिरणी मतदारसंघ माळशिरस, दुग्ध व्यवसाय मतदारसंघ जागा सांगोला, बँका, पतसंस्था मतदारसंघ माढा, महिला मतदारसंघ करमाळा सांगोला, अनु. जाती, जमाती - मोहोळ, इतर मागास प्रवर्ग - पंढरपूर, भटक्या जाती, जमाती - बार्शी.

यांनी घेतले अर्ज
जिल्हाबँकेचे संचालक होण्याकरता शुक्रवार १३२ जणांनी अर्ज घेतले आहेत. गुरुवार आणि शुक्रवार अशा दोन दिवसांत २३९ जणांनी उमेदावारी अर्ज घेतले आहेत. शुक्रवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार नारायण पाटील, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिलीप माने, प्रशांत परिचारक, माजी मंत्री संचालक दिलीप सोपल, सुभाष गुळवे, राजशेखर शिवदारे, चंद्रकांत देशमुख, रविकांत पाटील, रतिकांत पाटील, अण्णासाहेब रूपनर, उमाकांत राठोड यांनी अर्ज घेतले आहेत.

यांनी भरले अर्ज
विविध कार्यकारी सेवा सोसायटीत विद्यमान उपाध्यक्ष बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे, माजी आमदार राजन पाटील, विक्रांत पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अर्ज भरला तर बँक, पतसंस्था प्रवर्ग विमुक्त जाती प्रवर्गातून श्रीधर कोंडले यांनी अर्ज दाखल केला आहे.

नेत्यांची वाढती गर्दी
जिल्हाउपनिबंधक कार्यालयात राजकीय नेत्यांची गर्दी वाढली आहे. अर्ज दाखल करण्यास येणाऱ्यांसाठी कार्यालयाने काही सोयी केलेल्या आहेत. यात पाणी, पंखा बसण्यास सुविधा उपलब्ध केली आहे. प्रथमच जिल्हा उपनिबंधक कार्यालयात राजकीय नेते, कार्यकर्ते यांची एवढी गर्दी पाहण्यास मिळत आहे. अर्ज दाखल करण्याकरता सोमवारी मंगळवारी आणखी गर्दी होणार आहे.