आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करू अन् दुष्काळग्रस्तांना मदतही देऊ!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आेढ दिलेल्या पावसाने नुकतीच हजेरी लावली. पण ग्रामीण भागातील दुष्काळीस्थिती कायम आहे. पशुधन वाचवण्यासाठी बळीराजाची धडपड काही कमी झालेली नाही. अशा स्थितीत विद्यादेवता गणपती बाप्पा येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भक्तगण आतूर आहे. पण बाप्पांना अभिप्रेत असा पर्यावरणपूरक गणेशोत्सवच होईल. यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बी नाही. मिरवणुकांवर नाहक खर्च नाही. त्यातून वाचणाऱ्या पैशांतून जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याचा निर्धार मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळांच्या प्रमुखांनी केला आहे.

परतीच्या पावसाने शहरातील वातावरण मोकळे झाले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. तलाव भरले. त्याने सामान्य नागरिक सुखावला. त्यामुळे शहरात गणेशोत्सव अधिक उत्साहात होईल. पण ग्रामीण भागात अशी स्थिती नाही. जनावरांना चारा नसल्याने ऊसच चाऱ्यासाठी घालावा लागत आहे. आटलेल्या विहिरी अद्याप भरलेल्या नाहीत. पेरलेले उगवले नसल्याने तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मुख्यमंत्री ही स्थिती पाहून गेले. पण मदतीची हालचाल दिसून येत नाही. अशा स्थितीत गणेशोत्सव उत्साहात साजरा करणे याेग्य होणार नाही. सामाजिक बांधिलकी म्हणून मंडळांनी दुष्काळग्रस्तांना मदत द्यावी, असे आवाहनही मध्यवर्ती महामंडळांच्या प्रमुखांनी केले आहे.

सेवाभावी संस्थांचा पुढाकार
गणेशोत्सवाच्या नमित्ताने शहरातील काही सेवाभावी संस्थांनी स्तुत्य पुढाकार घेतला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासोबतच स्मार्ट सिटी, घनकचरा व्यवस्थापन, वाहतुकीचे िनयम आणि शिस्त आदींबाबत जनजागृती करणारे फलक लावण्यात येणार आहेत. त्यासाठी मार्कंडेय फाउंडेशन, पूर्वभाग मानाचा ताता गणपती, अन्नदाता बाप्पा गणपती आदी मंडळांनी यासाठी तयारी सुरू केली आहे.

डॉल्बीला बंदीच आहे
^मिरवणुकीत डॉल्बीला बंदीच आहे. ७० डेसीबलपेक्षा मोठा आवाज ठेवता येणार नाही, असे न्यायालयाचे निर्देश आहेत. मागील पाच-सहा मीटिंगमधून आम्ही मंडळांना डॉल्बीविना मिरवणुका काढण्यासाठी सूचना देत आहेत. अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई होईलच. बालसिंग राजपूत, पोलिस उपायुक्त

दुष्काळग्रस्तांना मदत देणार
^मिरवणुकांवर नाहक खर्च करता दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. याबाबत प्रबोधन करणारे देखावे करण्यासही सुचवले. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना पूर्व भागात रूजलेली आहे. त्यामुळे येथील मिरवणुकांत कुठलाच अनुचित प्रकार घडत नाही. यंदाही त्याचीच काळजी घेऊन पर्यावरणपूरक उत्सव करू. लक्ष्मीकांतगड्डम, अध्यक्ष, पूर्वभाग मध्यवर्ती मंडळ

"स्मार्ट सोलापूर'वर देखावे
^सर्वमंडळांना पर्यावरणपूरक उत्सव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुष्काळसदृश स्थिती असल्याने मिरवणुकांवरील अनावश्यक खर्च टाळून तो टंचाईग्रस्त शेतकऱ्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला. ‘स्मार्ट सिटी’मध्ये सोलापूरचा समावेश होणार असल्याने ‘स्मार्ट सोलापूर’ या संकल्पनेवर आधारित देखावे करण्याचेही सूचित केले आहे. डॉ.मल्लिकार्जुन तरनळ्ळी, अध्यक्ष, विजापूर रस्त्या मध्यवर्ती मंडळ

पारंपरिक वाद्ये वाजवा
^लष्करभाग मध्यवर्ती मंडळअंतर्गत सुमारे १०० विसर्जन मंडळे मिरवणुकीत सहभागी होतात. मंडळांची बैठक घेऊन, संवाद साधून डॉल्बीमुक्त मिरवणुका काढण्यासाठी सूचना देत आहोत. जनजागृती करत आहोत. मिरवणुकीत आवाजामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. विनायक यादव, अध्यक्ष, लष्कर मध्यवर्ती मंडळ

लेझीम पथकांचा सहभाग
^लेझीम,झांज पथकांचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे. डॉल्बीमुक्त मिरवणूक अशीच आमची संकल्पना आहे. आमच्या मंडळाअंतर्गंत २१२ मंडळे आहेत. मिरवणुकीत पंचवीस-तीस मंडळे सहभागी होतील. याशिवाय प्रत्येक मंडळांना एक झाडाचे रोप, एक ट्री गार्ड भेट देणार आहोत. त्या रोपाचे संगोपन त्यांच्याकडूनच होईल, याबाबत जाणीवपूर्वक लक्ष देणार आहोत. अनिल गवळी, अध्यक्ष, मध्यवर्ती गणपती मंडळ

अशोक चौक येथील प्रख्यात मूर्तिकार राजू गुंडला यांनी शंकराचा रूद्रावतार रूपातील १५ फूट उंच गणेशमूर्ती तयार केली. त्याचे वजन ९०० किलो आहे. ही मूर्ती कर्नाटकातील कलबुर्गी (गुलबर्गा) येथे जाईल.