आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गुरुवारी सकाळपासून घरगुती गणेश मूर्ती विसर्जनास सुरुवात झाली तर सकाळी साडेदहाच्या सुमारास गणपती घाट येथे सार्वजनिक गणेशमूर्तीच्या विसर्जनास प्रारंभ झाला. दिवसभरात सुमारे २५ हजार घरगुती गणपती तसेच १२५ सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. गणपती घाट, विष्णू घाट येथे पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सवाच्या मिरवणुकीस गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रारंभ झाला. देशमुख वाड्यातील मानाच्या देशमुख गणपतीची पालखी साडेतीनच्या सुमारास चौपाड येथील विठ्ठलासमाेर आली. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते गणेशाचे पूजन होऊनपालखी मार्गस्थ झाली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर सुशीला आबुटे यांच्यासह मध्यवर्ती मंडळाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दत्त चौक येथून सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. मध्यवर्ती मंडळाकडे सुमारे १५० मंडळांनी नोंदणी केली हाेती. यातील केवळ १६ मंडळांनी प्रत्यक्षात मिरवणुकीत सहभाग नोंदविला. यात सरस्वती सेवक तरुण मंडळ, समर्थ तरुण मंडळ, थोरला मंंगळवेढा तालीम मंडळ, पाणीवेस तालीम मंडळ, राणा गणपती, विश्व गणपती, सरदार गणपती, क्षत्रिय समाज तरुण मंडळ, स्वतंत्र भारत मंडळाचे बाळराजे गणपती, गोल तालीम, जय मातृभूमी, भुसार गल्ली येथील मालक गणपती, विजापूर वेस गणपती तरुण मंडळ, सर्वात शेवटी प्रथेप्रमाणे होते आजोबा गणपती मंडळ.

मिरवणूक मार्गावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. त्यामुळे मिरवणूक शांततेत वेळेत पार पडली. रात्री १२ वाजण्याच्या आधी मिरवणुकीतील वाद्ये बंद झाली. यंदाच्या वर्षी मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांनी लेझीमचा खेळ सादर करण्यावर भर दिला. समर्थ तरुण मंडळाने स्टेजवर समुद्र मंथनाचा देखावा सादर केला. यावेळी मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष दास शेळके, बसवराज येरटे, शंकरराव मुधोळकर, गणेश चिंचोळी, विजय पुकाळे, अनिल गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी
विद्यार्थ्यांचा पुढाकार
सकाळी सात वाजल्यापासून गणपती घाटावर घरगुती गणेश मूर्ती विसर्जनाची सुरुवात झाली. पर्यावरणप्रेमी दमाणी विद्या मंदिराचे काही विद्यार्थी विद्यार्थिनी घाटाच्या प्रवेशद्वारावर उभे होते. मूर्ती घेऊन येणाऱ्या भक्तांना ते आपुलकीने निर्माल्य मूर्ती दान करण्यास विनवत होते. तेथील एका मोठ्या बॅरलमध्ये निर्माल्य जमा केले. यामुळे यंदा विसर्जन कुंडात निर्माल्याचे प्रमाण खूप कमी होते.

लष्कर मध्यवर्ती : लेझीम आणि मशाल नृत्याने वेधले लक्ष
लोधीगल्ली येथील बालाजी मंदिर येथे गुरुवारी सकाळी सव्वादहा वाजता लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने पूजा करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ केला. यावेळी उपायुक्त नामदेव चव्हाण, सहाय्यक आयुक्त महेश जोशी, सहाय्यक आयुक्त सुभाष नेवे, दुय्यम पोलिस निरीक्षक संजय जगताप, मंडळाचे प्रकाश पारसवार, अब्राम कुमार, देवेंद्र भंडारे, लक्ष्मण बंबेवाले, भारत पसळवार, माजी आमदार उत्तमप्रकाश खंदारे, पक्षनेते संजय हेमगड्डी, स्वप्नील झंपले, वैभव पाटील, राजू जमादार, सुरेंद्र शिवशिंगवाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मिरवणुकीमध्ये मोरया तरुण मंडळाचा मशाल डान्स आकर्षक ठरला. आदर्श प्रतिष्ठानच्या लेसर लाईटमध्ये सादर करण्यात आलेल्या लेझीम कलेने सर्वांनी मने जिंकली. गुलजार तालीम संघाने लेझीम, जांबवीर तरुण मंडळाने डोलारे...डोलारे या नृत्यावर उत्कृष्टरीत्या टिपरी खेळ सादर केला. गणेश मंगलमूर्ती तरुण मंडळाचा लेझीम, श्री गोविंदराज तरुण मंडळाचा लेझीम, जय जवान सांस्कृतिक तरुण मंडळाने चित्रपटाच्या विविध गीतांवर नृत्य सादर केले.
महान बहुउद्देशीय तरुण मंडळाने दिमडी घेऊन नृत्य सादर करून वाहवा मिळवली. सुंदर नगर तरुण मंडळाने पाणी वाचवा, मुली वाचवा, निसर्ग वाचवा असा संदेश देणारे फलक हातात घेऊन भारत माता की जयचा जयघोष करत मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत तरुणाईबरोबर लहान मुलांचाही सहभाग होता. श्री जय हरी तरुण मंडळाने भवरा, आगीची लाठी आदी चित्तथरारक खेळ सादर केले.
पावसाच्या अखंड सरी अंगावर झेलत गणेश विसर्जन मिरवणुका अभूतपूर्व जल्लोषात निघाल्या. ढोल, लेझीम आणि झांजच्या गजरात ‘पुढच्या वर्षी लवकर या...’ असा नारा देत या मिरवणुका निघाल्या. रात्री बाराला सर्व वाद्ये बंद झाली. मध्यरात्रीनंतर त्यांची सांगता झाली. रात्री अडीच वाजता ताता गणपती मिरवणुकीचे विसर्जन झाले.
लष्कर मध्यवर्ती गणेश मंडळांतर्गत जय हनुमान मंडळाच्या ढोल पथकाने उपस्थितांची वाहवा मिळवली. मिरवणूक पाहण्यासाठी महिलांची गर्दी मोठी होती.

मिरवणुकीत मंडळे
मध्यवर्ती २९, लोकमान्य १९
पूर्वभाग २९, लष्कर ११३
विजापूर नाका ८५, बाळे २५
होटगीरोड ८, नीलमनगर २४
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ
पावसाच्या अखंड सरी अंगावर झेलत गणेश विसर्जन मिरवणुका अभूतपूर्व जल्लोषात निघाल्या. ढोल, लेझीम आणि झांजच्या गजरात ‘पुढच्या वर्षी लवकर या...’ असा नारा देत या मिरवणुका निघाल्या. रात्री बाराला सर्व वाद्ये बंद झाली. मध्यरात्रीनंतर त्यांची सांगता झाली. रात्री अडीच वाजता ताता गणपती मिरवणुकीचे विसर्जन झाले.
बातम्या आणखी आहेत...