आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganpati Mandals Will Show Smart City, Clean India Live Scenes In Solapur

गणेशोत्सव: स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत सजीव देखाव्यांवर मंडळांचा भर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत, पाणी वाचवा, नरेंद्र मोदींची भाषणे आदी यंदाच्या गणेशोत्सवातील सजीव देखाव्यांचे विषय आहेत. त्याची रंगीत तालीम सुरू असून, २५ सप्टेंबरपासून हे देखावे खुले होतील. टिळक चौक, चाटी गल्ली, तरटी नाका, बाळी वेस, घोंगडे वस्ती, भवानी पेठ आदी भागांत सजीव देखावे करण्यात येत आहेत. विनोदी अंगातून समाजप्रबोधन अशी विषयांची मांडणी करण्यात आली. त्याच्या रेकॉर्डिंगचे कामही जोमात सुरू झाले.
शहरातील प्रमुख मंडळे पौराणिक देखावे सादर करतात. पूर्वभागातील दाजी पेठ आणि भद्रावती पेठेत थर्मोकोलच्या देखाव्यांवर भर असतो. भवानी पेठ, घोंगडे वस्ती भागात नाटिका स्वरूपात प्रबोधन करणारे सजीव देखावे सादर करण्यात येतात. त्यात ज्वलंत विषय असतात. गेल्या वर्षी दिल्लीतील ‘निर्भया’ विषयाला घेऊन स्त्रीसन्मान, स्त्रीसंरक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला होता. यंदा मात्र दुष्काळी स्थिती घेऊन ‘पाणी वाचवा’चे संदेश देणारे सजीव देखावे आहेत. भविष्यात पाणीटंचाईचा सामना करताना काय करावे लागेल, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्यात अतिशयोक्ती असल्याने विनोद आहे. परिणामी प्रबोधनही असल्याचे सजीव देखावे लिहिणारे म्हणतात.
‘मिसाइल मॅन’ डॉ. अब्दुल कलामही...
देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नुकतेच निधन झाले. हा ‘मिसाइल मॅन’ कसा होता. त्यांनी देशासाठी किती महनीय कार्य केले, हेही सजीव देखाव्यातून दाखवण्यात येत आहे. त्यासाठी कलाम यांच्या डोक्यावरील वैशिष्ट्यपूर्ण केसांचा टोपही तयार करण्यात येत आहे.
दुष्काळी स्थितीने ग्रामीण भागात शांतता
ग्रामीण भागातील गणेशोत्सवात लोककला, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता आणि आरोग्य आदी विषयांवर सजीव देखावे करण्यात येतात. परंतु यंदा दुष्काळी स्थिती असल्याने ग्रामीण मंडळे शहराच्या रेकॉर्डिंग रूमकडे फिरकली नाहीत. त्याचा नाटकांसाठी पुरवण्यात येणाऱ्या साहित्य भांडारवर परिणाम झाला आहे.
डीजे साँगची चलती
- डीजे साँगवर मंडळांची माहिती देणे हा एक नवा प्रकार सुरू झाला आहे. त्याचे रेकॉर्डिंग पुण्यात होते. संगीत मिक्सिंगची ही अवघड कला आहे. ती शिकून त्याची यंत्रणा सोलापुरात कार्यान्वित केली. त्याला तरुणांचा मोठा प्रतिसाद आहे.
नितीन नवगिरे, किंग्ज रेकॉर्डस्