आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा समस्या गंभीर; तरीही सर्व्हेत सोलापूर राज्यात आठवे, देशात ठरले 115 वे शहर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवार पेठ बस डेपो परिसरात रस्त्यावर पडलेला कचरा. - Divya Marathi
बुधवार पेठ बस डेपो परिसरात रस्त्यावर पडलेला कचरा.
सोलापूर - घनकचरा निर्मूलनाची समस्या गंभीर असूनही केंद्राच्या सर्वेक्षणात स्वच्छतेबाबत सोलापूर राज्यात आठव्या क्रमांकाचे तर देशात ११५ व्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. रस्ते, कचराकुंडी भरलेली, घरांतील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्यांचे अनियमितपणे येणे, अशी स्थिती सोलापूरकर अनुभवत असताना केंद्राच्या या स्पर्धेने त्यांना धक्का दिला आहे. यावरून सर्वेक्षण स्पर्धेची गुणवत्ता आणि ‘स्वच्छता’ लक्षात आली आहे. 
 
सोलापूर महापालिकेने कचरा निर्मूलनाचे खासगीकरण केले आहे. शहराच्या निम्म्या भागाचा मक्ता दिला असून, तेथे खासगी मक्तेदाराकडून काम सुरू आहे. उरलेल्या निम्म्या भागात महापालिकेची सफाई विभागातील यंत्रणा काम करत आहे. मात्र, ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेला, पसरलेला कचरा दिसून येत आहे. कचराकुंडी भरलेल्या आहेत. घंटागाड्या नियमित आणि वेळेवर येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. 
 
गावठाण आणि हद्दवाढ भागात ठिकठिकाणी कचरा साठलेला आहे. शहरातील गावठाण भागात सम्राट चौक, जोडभावी पेठ, मधला मारुती परिसरात कचरा पडून होता. कचरा उचलण्यासाठी मनपाकडे उपलब्ध असलेल्या घंटागाड्या बुधवार पेठ येथील डेपोत थांबून होत्या. मागील आठवड्यात सोलापुरातील कचरा डेपोस आग लागली. 
 
महापालिकेकडून कचरा सफाईचे नियोजन होत नाही. मक्ता देण्यापासून गोंधळ सुरू आहे. कचरा टेंडर फाइल हाताळणारा मनपा कर्मचारी संजय व्हटकर यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. शहरातील कचरा प्रश्नास पार्श्वभूमी असताना आजही शहरात विविध भागात कचरा साचलेला दिसून येतो. सम्राट चौकातील श्रीहरी अपार्टमेंटसमोर कचरा साचलेला होता. सिद्धेश्वर मंदिराजवळील मनपा उद्यान कार्यालयासमोर कचरा साचलेला होता. हद्दवाढ भागात हत्तुरेवस्तीसह आदी भागात कचरा दिसून येत होता. मोकळ्या जागेवर कॅरीबॅग असून, त्यामुळे परिसर विद्रूपीकरण होताना दिसून येते. 
 
स्पर्धेचे निकष आणि १०० गुण 
४५ हागणदारीमुक्त आणि धनकचरा व्यवस्थापन 
२५ परिसर पाहणी 
३० लोकांचा सहभाग 
 
घरांतून कचरा उचलण्याचे नियोजन 
- काही भागात कचरा उचलल्यानंतर पुन्हा कचरा पडतो. हद्दवाढ भागातील मनपा झोन मध्ये मक्तेदारांकडून कचरा उचलण्यात येत आहे. त्यांच्याकडे वाहन संख्या कमी आहे. त्यांबाबत त्यांनी कल्पना दिली. कचरा निर्मूलनासाठी घराघरांतून कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात येत आहे.” संजय जोगधनकर, प्रभारी सफाई अधीक्षक, महापालिका 
 
पथकाने केली होती पाहणी 
केंद्र सरकारच्या नगरविकास खात्याकडून देशातील ५३४ शहरांत स्वच्छ भारत सर्वेक्षण करण्यात आले. त्यात सोलापूर शहराचा समावेश होता. १०० गुणांसाठी करण्यात आलेल्या सर्व्हेचा निकाल गुरुवारी केंद्र सरकारने जाहीर केला. या सर्व्हेत प्रथमच सहभागी झालेल्या सोलापूर शहराचा देशात ११५ वा क्रमांक तर राज्यात आठव्या क्रमांकावर आहे. सोलापुरात हागणदारीमुक्त, उघड्यावर शौचास जाणे, घनकचरा व्यवस्थापन, झाडू, क्षमता बांधणी आदी कामांची तपासणी जानेवारी महिन्यात करण्यात अाली. त्यासाठी केंद्र सरकारचे तीन जणांचे पथक आले होते.  
 
घंटागाड्या पडून 
महापालिकेच्या वतीने १४ व्या वित्त आयोगाच्या रकमेतून घंटागाड्या घेण्यात आल्या. त्यापैकी काही जागेवर थांबून आहेत. याकडे महापालिका वाहन सफाई विभागाने दुर्लक्ष केले आहे.
 
 राज्यातील पहिले दहा (कंसातदेशातील क्रमांक) 
१.नवी मुंबई (८), २. पुणे (१३), ३. बृहन्मुंबई (२९), ४. शिर्डी (५६), ५. पिंपरी चिंचवड (७२), ६. चंद्रपूर (७६), ७. अंबरनाथ (८९), ८. सोलापूर (११५), ९. ठाणे (११६), १०. धुळे (१२४). 
 
 
बातम्या आणखी आहेत...