आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: पंढरपूरच्या ‘स्वेरी’त अडीचशे किलोवॅट सौरवीज; प्रतिदिन 1 हजार 250 युनिट वीजनिर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- सध्या संपूर्ण देशात विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या समस्येतून काही प्रमाणात का होईना मार्ग काढण्यासाठी पंढरपूर येथील स्वेरी महाविद्यालयाने अपारंपरिक ऊर्जेचा (सौरऊर्जा) वापर करीत तब्बल २५० किलोवॅट सोलार आॅन ग्रीड रूफ टॉप सिस्टिम तयार करून त्याद्वारे स्वत:च्या महाविद्यालयामध्येच विजेची निर्मिती केली आहे. ‘स्वेरी’मधील एवढ्या मोठ्या क्षमतेचा सोलार आॅन ग्रीड रूफ टॉप सिस्टिम हा राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील बहुतेक एकमेव प्रकल्प असावा, असा दावादेखील या संस्थेकडून करण्यात आलेला आहे.    

स्वेरी महाविद्यालयामध्ये हा विस्तृत स्वरूपाचा सौरऊर्जेचा प्रकल्प उभारताना त्याचा सखोल अभ्यास करण्यात अाला. त्यानंतर पुण्याच्या एका कंपनीला अाॅर्डर देण्यात अाली. या प्रकल्पांतर्गत अभियांत्रिकीच्या मुख्य इमारतीवर वरील बाजूस व फार्मसीच्या इमारतीवर असे मिळून तब्बल २५० किलोवॅट सोलार आॅन ग्रीड रूफ टॉप सिस्टिम तयार करून त्याद्वारे विजेची निर्मिती केली आहे. या सोलार वीजनिर्मितीसाठी १ कोटी ७०  लाख रुपये इतका खर्च आला. या प्रकल्पातून प्रतिदिन १ हजार २५० युनिट वीजनिर्मिती होत आहे. 

वार्षिक जवळजवळ ४ लाख युनिट वीजनिर्मिती होऊ शकते. हा प्रकल्प तयार झाल्यानंतर स्वेरीने महावितरणसोबत करार (नेट मीटरिंग) केला आहे. या प्रकल्पासाठी झालेल्या खर्चाचा साधारण साडेतीन ते चार वर्षांत परतावा होऊ शकतो. या प्रकल्पामुळे संस्थेचे वीज बिल जवळपास ४० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. या प्रकल्पांच्या स्वत:च्या महाविद्यालयांसाठी विजेचा वापर करून जी शिल्लक राहिलेली वीज आहे ती महावितरणला विकली जाऊ शकते.   डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकल्प अधिकारी तथा विद्युत पर्यवेक्षक संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प पूर्ण करण्यात अाला.

वीज तुटवड्यापासून मुक्ती
स्वेरी संस्थेमध्ये हा प्रकल्प पूर्ण झाल्याने दिवसा लागणारी वीज महावितरणकडून सध्या स्वेरी संस्था घेत नाही. त्यामुळे आवश्यक असणाऱ्या ग्रामीण भागांना महावितरणकडून ती पुरविली जाऊ शकते. अशा प्रकारे स्वेरीने अप्रत्यक्षपणे शासनास मदतच केली आहे. या प्रकल्पासंदर्भात प्राचार्य डॉ.रोंगे म्हणतात, ‘सक्षम महाविद्यालयाने जर असे प्रकल्प केले तर ज्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विजेचा तुटवडा भासत आहे अशांना काही प्रमाणात वीज तुटवड्यापासून निश्चितच मुक्ती मिळेल.’   
बातम्या आणखी आहेत...