आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Goa Chief Minister Laxikant Parsekar At Pandharpur

बिहारचे कवित्व: मोहन भागवतांच्या मताचा काहीच परिणाम नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे भाजपचे प्रवक्ते नाहीत. ते संघाचे प्रमुख आहेत. बिहारमधील निवडणूक ही भाजपने लढविली होती, संघाने नव्हे. त्यामुळे मोहन भागवत यांनी केलेल्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्याचा बिहारमधील विधानसभा निवडणूकीवर मोठा परिणाम झाला असे म्हणणे चुकीचे ठरेल,’ असे मत गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रविवारी व्यक्त केले. पंढरपूरमध्ये दुपारी कुटुंबीयांसमवेत आलेल्या पार्सेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘मुख्यमंत्रिपदावर एक वर्ष पूर्ण झाल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलो आहे,’ असेही त्यांनी नमूद केले. बिहार निकालावर पार्सेकर म्हणाले, ‘बिहारमध्ये भाजपचा पराभव झाल्याचे आपण मानत नाही. सत्ता मिळाली नसेल. पण पराभव झाला असे म्हणणे चुकीचे आहे. कारण आम्ही तेथे सत्तेत नव्हतो. मागील निवडणुकीशी तुलना करता भाजपच्या जागांमध्ये दोन - तीन टक्क्यांचा फरक पडला. मात्र, भाजपच्या मतांची टक्केवारी वाढेली आहे. सत्ताधाऱ्यांसह विविध पक्षांनी एकत्र भाजपविरोधात एकत्र येऊन स्थापलेल्या महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविली. मतांचे विभाजन टाळल्याचा महाआघाडीला फायदा झाला. ’

पंढरपुरात भक्तनिवास बांधण्याचा विचार करू : गोव्यातील भाविकांसाठी पंढरपूरमध्ये भक्तनिवास बांधण्याविषयी जरूर विचार करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री पार्सेकर यांनी दिली. तसेच गोवा - तिरुपती रेल्वेची रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडे मागणी केली आहे. गोव्यातील खाणींत गैरउद्योग केलेल्यांना जनतेने शिक्षा दिली आहे. कुणाला शिक्षा करण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सनातन संस्थेवर बंदी चुकीची
एका व्यक्तीच्या चुकीमुळे पूर्ण संघटनेवर बंदीची मागणी चुकीची असल्याचे मुख्यमंत्री पार्सेकर म्हणाले. सनातन संस्थेचे मुख्यालय गोव्यात आहे. मात्र, त्यांनी तिथे काहीही चुकीचे केल्याचे आढळले नाही. त्यामुळे चौकशी होऊन पूर्ण सत्य समोर आल्याशिवाय एखाद्या संस्थेवर बंदीची मागणी चुकीची असल्याचा पुनरुच्चार पार्सेकर यांनी केला.