सोलापूर - देव दर्शनासाठी गेलेले सीए गणेश पावले यांच्या वसंत विहारमधील घरी चोरी झाली. चोरट्यांनी ३५ तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे पाच लाख रुपये लंपास केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पावले हे सोलापुरात गुरुवारी मध्यरात्री येणार अाहेत. त्यानंतरच दागिने आणि रक्कम किती गेली यांची नेमकी माहिती समोर येईल. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस अाला.
श्री. पावले हे चार्टर्ड अकाऊंटट म्हणून काम करतात. साखर पेठेत त्यांचे कार्यालय अाहे. त्यांचा मुलगा आणि मुलगी पुण्यात राहतात. सोलापुरातून ते पत्नीसह १५ जानेवारीला बनारस, हरिद्वार आदी ठिकाणी देवदर्शनाला गेले आहेत. गुरुवारी मध्यरात्री ते घरी येतील. पाणी भरण्यासाठी आणि सफाईसाठी काम करणारी महिला बुधवारी घरी अाली होती, तेव्हा मुख्य लोखंडी गेट लाकडी दरवाजा उचकटल्याचे दिसले. हा प्रकार पाहून त्यांनी शेजारी त्यांच्या नातेवाइकांना घटनेची माहिती दिली.
विरळ वस्तीवर गस्त वाढवली : चोरीच्याघटनांचा अभ्यास करता हद्दवाढ भाग, विरळ वस्ती, शहराच्या बाजूला नव्याने वाढणारी वस्ती या भागातच चोरीच्या घटना घडल्या अाहेत. त्यामुळे नाइट राऊंड, पोलिस गस्त पथक यांच्यात बदल करण्यात अाला अाहे. विरळ वस्ती भागात जादा पेट्रोलिंग राहील. गुन्हेगार वस्ती, रेकाॅर्डवरील चोरांची तपासणी मोहीम हाती घेण्यात अाल्याची माहिती पोलिस उपायुक्त बाळसिंग रजपूत यांनी दिली. वसंत विहारमधील चोरीच्या तपासासाठी विविध पथकाकडून काम चालू अाहे.
जानेवारी महिन्यातील असाही योगायोग
१२जानेवारी २०१५ रोजी जुना होटगी नाका येथील डाॅ. ठकार यांच्या घरात ६० तोळे दागिन्याची चोरी झाली होती. त्यानंतरही बुधवारी उघडकीस आलेली ही मोठी चोरी. जानेवारी महिन्यातच या दोन मोठ्या चोऱ्या झाल्या. डाॅ. ठकार यांच्या घरातील चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही. विशेष म्हणजे दोनच महिन्यांपूर्वी जैन गुरुकुल प्रशालेतील शिक्षक संजय भस्मे (रा. वसंत विहारजवळ) यांच्या घरात दिवसा चोरी झाली अाहे. दुपारी बारा ते चार या वेळेत घर बंद असल्याचे पाहून चोरांनी हा प्रकार केला होता.
पथके झाली रवाना
बेडरूममधीलकपाटातून दागिने पैसे चोरीला गेले अाहेत. दुसऱ्या बेडरूमधील कपाटातील साहित्य उचकटले अाहे. सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी, गुन्हे शाखेचे अधिकारी, श्वान पथक घटनास्थळी अाले. गुन्ह्याची पद्धत पाहून तपासाची चक्रे फिरवण्यात अाली अाहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा परिसरात तपासासाठी एक पथक गेले अाहे. रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढण्यात येत अाहे. फाैजदार चावडी पोलिसांनी प्राथमिक माहिती नोंदवून घेतली असून गुरुवारी पावले यांची तक्रार घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.