आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेरणी अनुदान कागदावर, दुबार पेरणीच्या अनुदानात वाढ हवी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपाचे पीक वाया गेले आहे. जिल्ह्यात सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील बहुतांश पिके पावसाअभावी करपली आहेत. त्यामुळे शेतकरी पेरणी केलेल्या पिकांवर नांगर फिरवून दुबार पेरणीच्या तयारीला लागले अाहेत. सरकारने दुबार पेरणीसाठी अनुदान देण्याची घोषणा केली असली तरी अजून हे अनुदान शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही.
सोलापूर जिल्ह्यात जूनपासूनच मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली होती. जून महिन्यात दहा दिवस पाऊस सुरू होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपासाठी बी-बियाणे खते खरेदी करून पेरणी केली. मात्र, १५ जूनपासून पाऊस थांबला. त्यामुळे खरिपातील बाजरी, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग ही पिके जळून गेली आहेत. पीक वाया गेल्याने आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
जिल्ह्यात दुबार पेरणीसाठी शासनाकडून अद्याप अनुदान मिळाले नाही. पाऊस पडल्यानंतर दुबार पेरणी होईल. जिल्ह्यात सुमारे २१ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी होईल, असा अंदाज शासनाकडे कळवण्यात आलेला आहे. अनुदान मिळाल्यास त्याचे वाटप करण्याचे नियोजन आहे. दत्तात्रय गवसाणे, प्रभारी कृषी अधीक्षक,
१८ टक्के क्षेत्रावर झालेल्या खरीप पेरण्या पूर्ण वाया गेल्या
जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत २०३ मि. मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना गेल्या ६० दिवसांत फक्त ५७ मि. मी. पावसाची शासन दप्तरी नोंद झाली आहे. गेल्या वर्षी ३० जुलैपर्यंत १२२ मि. मी. पाऊस झाला होता. यंदा पावसाने चांगलीच ओढ दिल्याने १८ टक्के क्षेत्रावर झालेल्या खरीप पेरण्या पूर्ण वाया गेल्या आहेत. खरिपाच्या ९२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. पाणी मिळाल्याने उगवलेली पिके जळून गेली आहेत. पिके जळून जात असल्याने शेतकरी कृषी विमा उतरवण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. पीकविमा योजनेची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत होती. मात्र, खरिपाच्या पेरण्या रखडल्याने राज्य सरकारने कृषी विमा योजनेला आणखी मुदत ऑगस्टपर्यंत वाढवून दिली आहे.
केवळ ४८ टक्के पेरण्या
आतापर्यंत ४८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्या, तरी पावसाअभावी या पेरण्या वाया गेल्यात जमा आहेत. बार्शी सांगोला तालुक्यांतच चांगला पाऊस झाला आहे. अन्य तालुक्यांमध्ये मात्र समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी केलेल्या पिकांवर दुसरे पीक घेण्याची तयारी सुरू केली आहे. पण, त्यासाठी पाऊसाची गरज आहे. सरकारने दुबार पेरणीसाठी हेक्टरी दीड हजार रुपये अनुदान मोफत बियाणे देण्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात मात्र हे अनुदान कृषी विभागाला प्राप्त झालेले नाही.
पाऊस नसल्याने पिके धोक्यात
राज्य सरकारने दुबार पेरणीसाठी दिलेले दीड हजाराचे अनुदान तुटपुंजे आहे. कामासाठी मजूर मिळत नाहीत. मिळाले तरी मजुरी जास्त द्यावी लागते. पाऊस नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. सरकारने जाहीर केलेल्या अनुदानात दुबार पेरणी करणे शक्य नाही. त्यामुळे या अनुदानात वाढ करावी.तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.'' बिळेणी सुंटे, शेतकरी संघटना कार्यकर्ते