आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकांसाठी भयमुक्त आणि पारदर्शी वातावरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ग्रामपंचायत निवडणुका मुक्त पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी दक्ष राहावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी प्रशासनास केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी रमेश चव्हाण, उपजिल्हाधिकारी श्रीमती रेश्मा माळी सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार आदी कर्मचारी उपस्थित होते.
श्री. सहारिया म्हणाले की, आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले आदेश सूचनांचे पालन करावे. जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक यांनी समन्वयाने काम करावे. आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था करावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या लोकसभा विधानसभा निवडणुकांप्रमाणेच दक्षता घेणे आवश्यक आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. भारत निवडणूक आयोगाप्रमाणेच समान अधिकार राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार असल्याचेही श्री. सहारिया यांनी स्पष्ट केले.

ग्रामपंचायत स्तरावर निवडणूक निर्णय अधिकारी असतात. त्यांचे प्रशिक्षण योग्य प्रमाणात झाले आहे किंवा नाही ते व्यवस्थित जबाबदारी पार पाडत आहे की नाही, याबाबत संबंधित तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या. जास्तीत जास्त संगणकीकरणाचा उपयोग केला पाहिजे, हे निवडणूक आयोगाने ठरविले होते. सोलापूर जिल्ह्यात याबाबत चांगले कार्य केले आहे. सर्व १९ हजार ५५७ अर्ज संगणकीकृत स्वीकारले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी त्यांच्या टिमचे अभिनंदन सहारिया यांनी केले.

श्री. बक्षी म्हणाले की, शासनस्तरावर निवडणूक आयोगांशी पूर्ण समन्वय ठेवण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये. पोलिस महसूल विभागात चांगला समन्वय असणे महत्त्वाचे आहे.

मुंढे यांनी केले प्रेझेंटेशन
श्री.मुंढे यांनी प्रेझेंटेशनद्वारे गामपंचायत निवडणुकीची पूर्वतयारी, आचारसंहिता, कायदा सुव्यवस्था, मतदान मतमोजणी याचे नियोजन उपाययोजनांची माहिती दिली. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मतदान यंत्रे, अन्य साहित्य, वाहतूक आराखडा, वाहने याची उपलब्धता, भरारी पथक, हिशेब तपासणी पथक, अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती याबाबत माहिती दिली. जिल्ह्यात एकूण १५ हजार १५१ अधिकारी, कर्मचारी नियुक्त केल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रत्येक घटनांचा आढावा घ्या
ग्रामपंचायत निवडणुका नि:पक्षपातीपणे पार पाडाव्यात. गावातील या निवडणुकीच्या पूर्वीची परिस्थिती, निवडणूक दिवशी, निवडणुकीनंतरही याचा विचार करावा. याबाबत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवडणुका झाल्यानंतरही मारामारी, हल्ले होत असतात. या निवडणुकीत तळागाळातल्या लोकांना भाग घेता आला पाहिजे. यासाठी पोलिस विभागाने दक्ष राहावे, असे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी आवाहन केले.