आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबांच्या सेवेतून मिळालेला आनंद संपत्तीहून कैक मोठा: डॉ. प्रकाश आमटे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा येथील रतनचंद शहा बँकेच्या वतीने समाजभूषण पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. प्रकाश आमटे त्यांच्या पत्नी मंदा आमटे. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष राहुल शहा उपस्थित होते. - Divya Marathi
मंगळवेढा येथील रतनचंद शहा बँकेच्या वतीने समाजभूषण पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. प्रकाश आमटे त्यांच्या पत्नी मंदा आमटे. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष राहुल शहा उपस्थित होते.
मंगळवेढा- आज समाजजीवन पैसा आणि संपत्तीमागे धावत आहे. गोरगरिबांच्या सेवेतून मिळालेला आनंद हा पैसा आणि संपत्तीपेक्षा मोठा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. शनिवारी (दि. १५) येथील श्री रतनचंद शहा सहकारी बँकेच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार आमटे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. अंबेजोगाई येथील अभिजित जोंधळे यांनी ही मुलाखत घेतली. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. 
 
जीवनपट उलगडताना आमटे म्हणाले, वैद्यकीय शिक्षण घेऊनही बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून हेमलकसासारख्या दुर्गम भागात काम सुरू केले. यासाठी पत्नी डॉ. मंदाकिनी हिने साथ दिली. सुरुवातीला आदिवासींची भाषा अवगत करण्याचे आव्हान होते. त्यांना आपलेसे करणे महत्त्वाचे होते. मंदाकिनी हिने त्यांची भाषा अवगत केली. तत्कालीन सरकारने वैद्यकीय पदवी घेतल्याचे सिद्ध करून दाखवा, असे पत्र दिले होते. परंतु आपण ही बाब गांभीर्याने घेतली नाही. 
 
दुपारी चार वाजता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमटे यांनी विद्यार्थी दशेतील अनेक किस्से सांगितले. ते म्हणाले, तुमच्यावर भावी भारताचे भविष्य अवलंबून अाहे. शिक्षणाशिवाय पिढी घडत नाही. शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम आहे. त्याच्याशिवाय तरणोपाय नाही. आदिवासी भागातील शाळेचा पहिला मुलगा जेव्हा डॉक्टर झाला तेव्हा झालेला आनंद आजही स्मरणात आहे. त्यांचा नातू आदिवासी भागातील शाळेत शिक्षण घेत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. 
 
प्रास्ताविकात बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांनी बँकेच्या ५४ वर्षांच्या प्रगतीचा आढावा मांडला. सध्या ११ शाखांमध्ये १४ हजार सभासद, ३४ कोटी भागभांडवल असल्याचे म्हटले. याप्रसंगी मंदा आमटे, बँकेचे उपाध्यक्ष रामभाऊ जगताप, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजित शहा, माजी प्राचार्य बी. टी. पाटील, बँकेचे संचालक किसन गवळी, शिवाजी पवार, प्राचार्य एन. बी. पवार, नगराध्यक्षा अरुणा माळी, भीमराव मोरे उपस्थित होते. 
 
रत्नप्रभा सोशल फाउंडेशनच्या वतीने एक लाख रुपये, अप्पासाहेब पुजारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ५१ हजार रुपये, समाजमित्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १० हजार रुपयांचा धनादेश आणि शहा बँकेच्या पुढाकाराने जमवलेली १६ टन ज्वारी आदिवासींसाठी आमटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. 
 
 
बातम्या आणखी आहेत...